Join us  

सुख म्हणजे नक्की काय असतं... पुन्हा कळणार, 'एका लग्नाची पुढची गोष्ट' लवकरच रंगभूमीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 3:29 PM

प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांनी तितक्याच ताकदीने या नाटकातील आपापल्या भूमिकांना न्याय देत रसिकांना हसवलं आणि मनोरंजन केले. त्यामुळेच नाट्य रसिकांनी हे नाटक आणि या जोडीला डोक्यावर घेतले. आता रसिकांसाठी खूशखबर आहे. या नाटकाचा पुढचा भाग लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.

'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं' असं म्हणत नाट्यरसिकांना खळखळून हसवणारे आणि रसिकांचं धमाल मनोरंजन करणारे अभिनेता म्हणजे प्रशांत दामले. एक सच्चा कलाकार, निर्माता आणि विक्रमवीर म्हटल्यावर मराठी रंगभूमीवर एकच नाव ओठावर येतं ते म्हणजे प्रशांत दामले... ते पुन्हा एकदा रसिकांसाठी एक सच्ची कलाकृती घेऊन आलेत.एका लग्नाची गोष्ट या नाटकातून प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर या जोडीने रसिकांची मने जिंकली. लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरच्या गंमतीजंमती या नाटकात मोठ्या खूबीने मांडण्यात आल्या होत्या. प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांनी तितक्याच ताकदीने या नाटकातील आपापल्या भूमिकांना न्याय देत रसिकांना हसवलं आणि मनोरंजन केले. त्यामुळेच नाट्य रसिकांनी हे नाटक आणि या जोडीला डोक्यावर घेतले. आता रसिकांसाठी खूशखबर आहे. या नाटकाचा पुढचा भाग लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. 

'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे. या नाटकातून प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर पुन्हा एकदा नाट्यरसिकांना त्यांच्या जागेवर खिळवून ठेवण्यासाठी आणि त्यांना हसवण्यासाठी सज्ज आहेत. श्रीरंग गोडबोले लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित हे नाटक नोव्हेंबर महिन्यात रंगभूमीवर रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. प्रशांत दामले घ्या आणि कविता लाड रसिकांना खिळवून ठेवण्याचं अजब अभिनय सामर्थ्य या कलाकारांकडं आहे. त्यामुळे रसिक पुन्हा एकदा हसूनहसून लोटपोट होतील यांत शंका नाही. शिवाय एका लग्नाची ही पुढची गोष्ट रसिकांच्या पसंतीस नक्कीच पात्र ठरेल.

अभिनेता प्रशांत दामले यांची ‘गायक’ प्रशांत दामले अशी एक वेगळी ओळख आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकात त्यांनी गायलेले ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेले आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे शब्द रसिकांच्या ओठावर आजही येतात. त्यामुळे पुन्हा हे गाणे नाट्यगृहात गुंजणार असल्यामुळे नाट्यरसिकांसाठी ही मनोरंजनाची मोठी पर्वणीच ठरणार आहे. 

टॅग्स :प्रशांत दामले