Join us  

समांतर रंगभूमीचे आधारस्तंभ अरुण काकडे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 4:03 PM

आविष्कार नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ आणि समांतर रंगभूमीवर रंगायन नाटयसंस्थेचे संस्थापक सदस्य अरुण काकडे यांचं नुकतंच निधन झालं.

मुंबईः आविष्कार नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ आणि समांतर रंगभूमीवर रंगायन नाट्यसंस्थेचे संस्थापक सदस्य अरुण काकडे यांचं दुपारी २.३० वाजता मुंबईत निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. पन्नाहून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणारे आणि नाट्यवर्तुळात काकडे काका या नावाने सुपरचित असणाऱ्या या रंगकर्मीच्या निधनाने समांतर रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

अरूण काकडे ६० वर्षांहून जास्त काळ रंगभूमीवर कार्यरत होते. ९४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्षही होते. त्यांचं अमका हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झालं होतं.  काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.आविष्कार नाट्यसंस्था ज्यांच्या खांद्यावर मजबूत म्हणून आज उभी आहे त्यात काकडे काकांचा वाटा सर्वात जास्त होता. ६० वर्षांहून जास्त काकडे काकांचं प्रायोगिक रंगभूमीशी नातं होतं. वयाची ८५ वर्ष पार करूनही तरूणांना लाजवेल अश्या उत्साहात आविष्कारच्या माध्यमातून नवनवीन नाटकं ते आत्ताआत्तापर्यंत रसिकांसमोर सादर करत होते. काकडे काकांनी आपली रंगभूमीवरची वाटचाल पुण्यातून सुरू केली. मात्र त्यांच्यातला रंगकर्मी त्यांना मुंबईत घेऊन आला. त्याकाळातल्या विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे या दिग्गज रंगकर्मींसोबत त्यांनी रंगायन ही नाट्यसंस्था दादरच्या छबिलदास शाळेत सुरू केली. या संस्थेतर्फे विविध विषयांवरील नाटकं त्याकाळात सादर केली जात होती. रंगायन या नाट्यसंस्थेत पुढे वाद झाले. आणि ही संस्था फुटली आणि काकडे काकांनी अरविंद देशपांडे आणि विजया मेहता यांच्यासोबत १९७१ साली आविष्कार ही नवीन नाट्यसंस्था सुरू केली. आविष्कार नाट्यसंस्थेच्या स्थापनेपासूनच काकडे काकांनी तेथील व्यवस्थापनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली जी आजतागायत समर्थपणे त्यांनी पेलली. आविष्कार  ने छबिलदास चळवळ उभी केली . या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले . रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले . काकडे काका या चळवळीचे े शिलेदार होते .  त्यांच्या वयाची पंच्याहत्तरी  आविष्कार 'ने मोठ्या थाटात साजरी केली . त्यावर्षी काकडे काकांनी १२ महिन्यांत १२ नवीन नाटकं ' आविष्कार ' तर्फे रंगमंचावर आणली . आपल्या इतक्या वर्षाच्या कारर्किदीत त्यांनी रंगकर्मींच्या जवळपास तीन पिढ्या पाहिल्या आणि घडवल्याही.

टॅग्स :अरूण काकडे