Join us  

आर्ची आली रं...म्हणत गावकऱ्यांची उडाली झुंबड, रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी कोरोनाचाही पडला विसर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 2:41 PM

Rinku Rajguru fans : रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

सेलिब्रेटी म्हटलं की, त्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये पहायला मिळते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुर असतात. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कुठे सेलिब्रेटी येत आहेत, हे समजले की त्यांना पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडते. तसेच काहीसे मराठी चित्रपटसृष्टीतील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगूरुच्या बाबतीत घडले.

नांदेडमधील सारखनी इथल्या लेंगी महोत्सवाला रिंकूने हजेरी लावली होती. तिथे तिला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. इतकेच नाही तर तिथल्या लोकांना कोरोनाचाही विसर पडला होता. 

परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. त्यामुळे तिची चाहत्यांमधली क्रेझ आजही पहायला मिळते. आज ती कुठेही गेली, तर तिला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी उसळते.

टीव्ही ९च्या रिपोर्टनुसार, रिंकू राजगुरू नांदेडमधील सारखनी येथे लेंगी महोत्सवात पाहुणी म्हणून गेली होती. यावेळी तिला पाहण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडाली होती.सैराटच्या यशानंतर रिंकू राजगुरूला चांगल्या चित्रपटाच्या ऑफर्स आल्या. या सिनेमानंतर तिने कागर, मेकअप या चित्रपटात काम केले. तसेच ती लारा दत्तासोबत हिंदी वेबसीरिज हंड्रेडमध्येदेखील झळकली. नुकतीच ती अॅमेझॉन प्राइमवरील अनपॉज्ड या सिनेमातही पहायला मिळाली.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरू