Join us

​‘कुठलंही चॅनल आमचं भविष्य ठरवू शकत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 22:13 IST

 झी’वाल्यांना ‘सैराट’चा शंभर कोटींचा बिझनेस करायचा होता. म्हणून  ‘एक अलबेला’ जाणीवपूर्वक पाडला गेला, असा आरोप करून ‘ एक अलबेला’ ...

 झी’वाल्यांना ‘सैराट’चा शंभर कोटींचा बिझनेस करायचा होता. म्हणून  ‘एक अलबेला’ जाणीवपूर्वक पाडला गेला, असा आरोप करून ‘ एक अलबेला’ या चित्रपटात भगवान दादा यांची भूमिका साकारणारे अभिनेते मंगेश देसाई यांनी  खळबळ उडवून दिली. मंगेश देसार्इंच्या पाठोपाठ आता ‘डिस्को सन्या’च्या निर्माता व दिग्दर्शकांनीही आपला चित्रपट राजकारणाचा बळी ठरण्याची भीती व्यक्त केली आहे. ‘लोकमत’च्या नागपूर कार्यालयास ‘डिस्को सन्या’च्या टीमने भेट दिली. यावेळी ‘डिस्को सन्या’च्या टीमने मराठी चित्रपट सृष्टीत सुरु असलेल्या ‘गनिमी’ राजकारणावर ‘थेट’ वार केले. आमचा सिनेमा चांगला की वाईट हे आमचे प्रेक्षक मायबाप ठरवतील. कुठलेही चॅनल आमचं भविष्य ठरवू शकत नाही. जातीचे वा सहानुभूतीचे भांडवल करून आम्हाला आमचा सिनेमा ‘मोठा’ करायचा नाही. आमचे हात दगडाखाली आले आहेत हे खरे आहे. आम्हाला स्लॉट दिले जात नाहीत, आमच्या गाण्याला एनओसी दिली जात नाही, हे वास्तव आहे. नाना पाटेकरांनी आपल्या चित्रपटात ‘भडव्या’ म्हटलेलं चालतं. त्याला ‘यू’ सर्टिफिकेट मिळतं. पण आमच्या चित्रपटात एकही शिवी नाही. केवळ चित्रपटातील कॅरेक्टर ‘सन्या’ अतिहुशार दाखवलाय. लहान मुलं त्याला फॉलो करण्याची भीती आहे, या सबबीखाली आम्हाला ‘यूए’ सर्टिफिकेट दिल्या जातं, हे सगळं राजकारण आहे. ‘डिस्को सन्या’ लोकांपर्यंत पोहोचूच नये, यासाठीचे हे छुपे प्रयत्न आहेत, असा परखड आरोप ‘डिस्को सन्या’चे निर्माते सचिन पुरोहित, अभिजीत कवठाळकर आणि दिग्दर्शक नियाज मुजावर यांनी केला. अर्थात कुठलंही चॅनल आमचं भविष्य ठरवू शकत नाही. एक चित्रपट पाडाल, आम्ही दुसरा काढू. दुसरा पाडाल आम्ही तिसरा काढू. आम्ही लढू. आमचा चित्रपट चांगला की वाईट हे केवळ  प्रेक्षकच ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.......................वकाव् फिल्म्स प्रस्तुत, सचिन पुरोहित व अभिजीत कवठाळकर निर्मित  आणि नियाज मुजावर दिग्दर्शित ‘डिस्को सन्या’ या सिनेमात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त बालकलाकार पार्थ भालेराव मुख्य भूमिकेत आहे.  पार्थ भालेरावने साकारलेल्या ‘सन्या’ या कॅरेक्टरची फटकेबाजी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.