Join us  

अमृता खानविलकर आणि पुष्कर जोगच्या 'वेल डन बेबी'मधील 'आई बाबा' गाण्याला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 3:39 PM

'वेल डन बेबी' चित्रपटातील म्युझिक अल्बम प्रदर्शित करण्यात आला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता पुष्कर जोगचा आगामी चित्रपट ‘वेल डन बेबी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या चित्रपटाचा म्युझिक अल्बम प्रदर्शित करण्यात आला आहे. या साऊंड ट्रॅकमधील ‘आई-बाबा’ हे गाणे अतिशय सुंदर झाले असून ते जगात प्रेम आणि नवीन आयुष्य साजरे करण्याविषयी आहे, जे आपल्या जीवलगांसोबत आपल्याला देखील गुणगुणायला भाग पाडते.

या अल्बमविषयी अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला की, “संगीत हा आमच्या ‘वेल डन बेबी’ चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक गाण्याला सखोल असा अर्थ आहे. प्रसंगांना साजेशा असलेल्या या गाण्यांमुळे चित्रपट नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जातो. रोहन-रोहन ही मराठी सिने क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावंत जोडी असून त्यांनी ‘वेल डन बेबी’चे संगीत तयार केले आहे.”

‘आई-बाबा’ या प्रदर्शित झालेल्या पहिल्या गाण्याला सिनेमात ओटी भरण्याची पार्श्वभूमी लाभली आहे. सिनेमातील दाम्पत्याला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली असून त्यांच्या जीवनातील हा गोड भाग या गाण्यातून समोर येतो. प्रत्येक गाणे हे सर्जनशील लेखणीतून साकारले आहे. त्याचे चित्रीकरण देखील उत्तम झाले आहे” असेही पुष्कर म्हणाला.

 ‘आई बाबा’ हे गाणे अतिशय प्रतिभावंत अशा रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच त्याचे संगीत संयोजन देखील केले आहे. तर वलय मुळगुंद याच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे. संगीत संयोजनात रोहन गोखले याने देखील आपली भूमिका चोख निभावली असून उर्वरीत गाण्यांना अर्पिता चक्रवर्ती या गायिकेचा स्वरसाज लाभला आहे.

 ‘वेल डन बेबी’ हा सिनेमा प्रियांका तन्वर हिने दिग्दर्शित केला असून मर्मबंधा गव्हाणे याच्या लेखिका आहेत. या मध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद पंडित, मोहन नाडर आणि पुष्कर जोग हे सिनेमाचे निर्माते आहेत तर व्हिडीओ पॅलेस सादरकर्ते आहेत. ९ एप्रिलला हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.

टॅग्स :अमृता खानविलकरपुष्कर जोग