Join us

अमिताभ बच्चन यांनी उंबुटू मराठी सिनेमाचे जाहीरपणे केले कौतुक,सिनेमाचा ट्रेलर पाहण्याचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 14:42 IST

'उबुंटू' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री या सिनेमातून त्यांच्या दिग्दर्शक म्हणून नव्या इनिंगची सुरुवात ...

'उबुंटू' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री या सिनेमातून त्यांच्या दिग्दर्शक म्हणून नव्या इनिंगची सुरुवात करत आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यातच उबुंटू हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येण्याआधी एक कौतुकास्पद अशी गोष्ट घडली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशहा आणि महानायक बिग बी अमिताभ बच्चन हेसुद्धा उंबुटू या सिनेमाचा ट्रेलर पाहून भारावून गेले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी उंबुटू या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “भारतीय सिनेमा कात टाकतो आहे आणि दिवसेंदिवस विविध चांगले विषय तसंच कथा सिनेमाच्या माध्यमातून हाताळल्या जात आहेत.त्यामुळे उंबुटू या मराठी सिनेमाचा ट्रेलर जरुर पाहा” अशी पोस्ट बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली आहे. दिग्दर्शक म्हणून नव्या इनिंगची सुरुवात असणा-या उंबुटू या सिनेमासाठी खुद्द महानायकाकडून एवढी मोठी पसंतीची पावती मिळाल्याने दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री याची अवस्था आज मैं ऊपर... आसमाँ नीचे अशीच काहीशी झाली आहे. बिग बी यांच्या या पोस्टमुळे पुष्कर भारावून गेला आहे. त्यानंही आपल्या भावनांना सोशल मीडियावर वाट मोकळी करुन दिली आहे. “माझ्यासाख्या नवख्या आणि दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु करु पाहणा-याला भारतीय चित्रपटसृष्टीच्या शहेनशाहचे अशाप्रकारे आशीर्वाद मिळणे हे मी माझं भाग्य समजतो. माझी नम्र आणि मनापासून इच्छा आहे की बिग बींना उंबुटू हा सिनेमा पाहण्यासाठी वेळ मिळावा”, अशा शब्दांत पुष्करने सोशल मीडियावर बिग बींच्या कौतुकाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उंबुटू हा सिनेमा 15 सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. शाळेसाठी जिद्दीने लढणा-या मुलांची गोष्ट सांगणारा उंबुटू हा सिनेमा आहे. ट्रेलरलाच बिग बीं अमिताभ यांनी पसंती दिल्याने रिलीजआधीच उंबुटू सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.