Join us  

अजय फणसेकर आता वळलेत 'सीनियर सिटिझन'कडे

By अजय परचुरे | Published: June 17, 2019 10:04 AM

ख्यातनाम दिग्दर्शक अशी ओळख असणारे दिग्दर्शक अजय फणसेकर आता सिनिअर सिटिझन हा नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येतायत.

ठळक मुद्देअजय फणसेकरांचे सिनेमे म्हणजे उत्तम संहिता आणि अप्रतिम दिग्दर्शन म्हणून ओळखले जातात.

'रात्र आरंभ, एनकाऊंटर ,यही है जिंदगी  'एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर' असे उत्तमोत्तम चित्रपट केलेले अभिनेता , लेखक, दिग्दर्शक अजय फणसेकर आता सीनियर सिटिझनकडे वळले आहेत. अर्थात सीनियर सिटिझन हा त्यांचा नवा चित्रपट असून, या चित्रपटाचं चित्रीकरण आता लवकरच सुरु होणार आहे. अजय फणसेकरांचे सिनेमे म्हणजे उत्तम संहिता आणि अप्रतिम दिग्दर्शन म्हणून ओळखले जातात. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या प्रत्येक सिनेमाचा विषय हा अतिशय वेगळा होता. त्यामुळे अश्या वेगळ्या विषयांवरचे सिनेमे हाताळणाऱ्या दिग्दर्शक अजय फणसेकरांच्या प्रत्येक येणाऱ्या नवीन सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कुतुहल असते. 

 ॐ क्रिएशन्स ही निर्मिती संस्था सीनियर सिटिझन  या चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाचा विषय, त्यातील कलाकार या विषयींचा तपशील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, आजपर्यंत अजय फणसेकर यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास सीनियर सिटिझनही प्रेक्षकांना नक्कीच सरप्राइज ठरेल असं आवर्जून म्हणता येईल. त्यांच्या प्रत्येक सिनेमात आजपर्यंत एक अनोखा आणि वेगळा असा विषय मांडण्यात आला आहे. रात्र आरंभ हा अजय फणसेकर यांचा  अतिशय गाजलेला सिनेमा होता. यातील दिलीप प्रभावळकर आणि दिपक शिर्के यांच्या भूमिकांचं त्यावेळी विशेष कौतुकही झालं होतं. 

सीनियर सिटिझन हा एक थ्रिलरपट आहे. एक वेगळं कथानक या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळेल, असं अजय फणसेकर यांचे मत आहे. अजय फणसेकर यांचा यापूर्वी आलेला चीटर हा सिनेमाही गाजला होता. या सिनेमातील अभिनेता वैभव तत्ववादी याच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं होतं. सिनियर सिटिझन सिनेमातही वृध्दांना सतावत असलेल्या समस्या, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ,हे मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या या सिनेमातील कलाकारांची जुळवाजुळव सुरू असून लवकरच सिनिअर सिटीझन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.