Join us  

अभिनेत्री सोनाली खरेचे रंगभूमीवर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 4:58 PM

'बाय बाय बायको' या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन सुदीप मोडक आणि नीरज शिरवईकर यांनी केले आहे.

ठळक मुद्दे सोनाली खरे करणार 'बाय बाय बायको' या विनोदी नाटकात कामनवरा-बायकोच्या नात्यांमधील मजेशीर कुरघोड्या 'बाय बाय बायको' नाटकात

मालिका व चित्रपटात विविध भूमिकांतून रसिकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री सोनाली खरे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला हृद्यांतर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली. त्यानंतर आता सोनाली रंगभूमीवर पदार्पण करते आहे. 'बाय बाय बायको' या विनोदी नाटकात ती काम करताना दिसणार आहे. सध्या या नाटकाच्या तालीम सुरू आहे. 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने व्यावसायिक नाटकात पहिल्यांदाच काम करत असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली. यावेळी तिने नाटकाचा पोस्टर व टीझरही शेअर केला आहे. 'बाय बाय बायको' या नाटकाची टॅगलाईन थोडी लव्हली... थोडी सायको अशी आहे.'बाय बाय बायको' या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन सुदीप मोडक आणि नीरज शिरवईकर यांनी केले आहे. या नाटकात नवरा-बायकोच्या नात्यामध्ये एकमेकांवर केल्या जाणाऱ्या मजेशीर कुरघोड्या पाहायला मिळणार आहे. 

या नाटकाबद्दल सोनाली खरे म्हणाली की,  'हे माझे पहिलेच व्यावसायिक नाटक असल्यामुळे थोडे दडपण आहे. मी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. मात्र आतापर्यंत मी विनोदी भूमिका केली नव्हती. या नाटकामध्ये खूप गिमिक्स असणार आहेत. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांच्यासोबत नाटक करायचे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान आहे. त्या दोघांचे टायमिंग पकडणे फार कठीण असते. मी या नाटकाबाबत खूपच उत्सुक असून माझे नाटकातील काम प्रेक्षकांना भावेल अशी आशा आहे. '        'बाय बाय बायको' या नाटकात सोनाली खरेसह प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी, सोनाली पंडित, नेहा शितोळे आणि स्नेहा काटे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हे नाटक या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली खरे आता रंगभूमीवर काय कमाल दाखवते, हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.