Join us  

अभिनेता भरत जाधवची लेक बनली डॉक्टर, सर्वजण करताहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 5:58 PM

अभिनय क्षेत्रात न येता सुरभीने मेडिकल क्षेत्र करिअर म्हणून निवडले आहे.

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेता भरत जाधवने प्रेक्षकांच्या मनात छाप उमटविली आहे. भरत जाधव सोशल मीडियावर सक्रीय असतो आणि या माध्यमातून तो चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतेच त्याने जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

अभिनेता भरत जाधवने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर त्याच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, डॉ. सुरभी भरत जाधव. खूप आनंद आणि अभिमान.

भरत जाधवच्या या पोस्टवर फक्तच चाहते नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील कौतुकाचा वर्षाव करत आहे. एमबीबीएस परीक्षेत उत्तम गुण मिळवून सुरभीने आपले वैद्यकीय शिक्षण पुण्याच्या एसकेएनएमसी कॉलेज मधून पूर्ण केले आहे. बऱ्याच कलाकारांच्या मुलांनी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. मात्र आपल्या वडीलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न येता सुरभीने मेडीसीन आणि सर्जरी क्षेत्र करिअर म्हणून निवडले आहे.

मुळचे कोल्हापूरचे असलेले भरत जाधव यांनी सुरूवातीच्या काळात कॉलेजमध्ये असताना विविध नाटकात काम केले होते. तिथेच त्याचे केदार शिंदे आणि अंकुश चौधरी सोबत मैत्री जमली. ऑल द बेस्ट हे त्यांचे नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. सही रे सही, मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत अशा अनेक नाटकांतून त्याच्या भूमिकेचे नेहमीच कौतुक करण्यात आले. ‘लक्ष्मी’ हा त्याने अभिनित केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर त्याचे मुक्काम पोस्ट लंडन, खतरनाक, गलगले निघाले, जत्रा आणि नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे असे बरेच चित्रपटही खूप हिट ठरले.

टॅग्स :भरत जाधव