Join us  

'मी पण सचिन'मध्ये झळकणार अभिजीत खांडकेकर',अशी असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 8:00 AM

हा सिनेमा येत्या १ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर सोबत प्रियदर्शन जाधवही झळकणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील गुरुनाथ म्हणजेच गॅरी अर्थातच अभिनेता अभिजीत खांडकेकर आता रूपेरी पडद्यावरून रसिकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'मी पण सचिन' या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. टीझर पाहून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असतानाच आता चित्रपटाचे नवीन पोस्टर आले आहे. या पोस्टरमध्ये स्वप्नील जोशीसोबत अभिजीत खांडकेकरही झळकत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील आक्रमक हावभाव बघून ही भूमिकाही विशेष असणार, याचा आपण अंदाज बांधू शकतो. आता अभिजीत या चित्रपटात नक्की कोणती भूमिका साकारत आहे, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. खरं तर क्रिकेट आणि आयुष्याचा खूप जवळचा संबंध आहे.

क्रिकेटमध्ये जसे शेवटच्या टप्प्यापर्यंत काही सांगता येत नाही, आयुष्यचेही अगदी तसेच असते. क्रिकेट आणि आयुष्यातील हे साम्य दाखवणारा, प्रेम, नात्याची परिभाषा शिकवणारा आणि आपल्या स्वप्नांचा माग घेण्यास प्रवृत्त करणारा हा सिनेमा येत्या १ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

या चित्रपटात स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर सोबत प्रियदर्शन जाधवही झळकणार आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन'  या चित्रपटाच्या निर्मात्याची धुरा नीता जाधव, संजय छाब्रिया, गणेश गीते आणि निखिल फुटाणे यांनी सांभाळली आहे. तर श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरणही केले जाणार आहे.

नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशनल सॉंग चित्रित करण्यात आले. ‘आयला आयला सचिन' असे या जोशमय गाण्याचे बोल असून सचिनच्या फॅन्ससाठी हे गाणे एक पर्वणीच ठरणार आहे. या गाण्यामध्ये स्वप्निल जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसत असून एका खेडेगावातील बाजारात हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. बाजार म्हटले, की डोळ्यांसमोर येतात ते भाजीवाले, बॅण्डवाले, वासुदेव आणि लहान मुले. यांच्यासह सचिनचे भव्य पोस्टरही या गाण्यात झळकत आहेत. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच उत्साहपूर्ण वातावरणात गाण्याचे चित्रीकरण झाले आहे.

'आयला आयला सचिन' हे गाणं त्रिनीती ब्रदर्स म्हणजेच हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केले असून आदित्य पाटेकर यांनी स्वरबद्ध केले आहे तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. 

टॅग्स :स्वप्निल जोशी