अभय झाला रिपोर्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 08:29 IST
प्रायोगिक रंगभूमीवर आपल्या अभिनयानं लक्ष वेधून घेतलेला अभय महाजन रिपोर्टर झाला आहे. रंगा पतंगा या चित्रपटात त्यानं इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या ...
अभय झाला रिपोर्टर
प्रायोगिक रंगभूमीवर आपल्या अभिनयानं लक्ष वेधून घेतलेला अभय महाजन रिपोर्टर झाला आहे. रंगा पतंगा या चित्रपटात त्यानं इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या रिपोर्टरची भूमिका निभावली आहे. युट्यबूवर खूप लोकप्रिय असलेल्या टीव्हीएफ पिचर्स या वेब सीरिजमुळे सध्या अभय चर्चेत आहे. त्याशिवाय हिंदी, इंग्रजी नाटकं, हिंदी चित्रपटही करतो आहे. यापूर्वी त्यानं काही मराठी चित्रपट केलेले असले, तरी रंगा पतंगा हा त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्य भूमिकांना समांतर अशी त्याची व्यक्तिरेखा आहे. दुष्काळ कव्हर करायला आल्यानंतर जुम्मनचे बैल हरवल्याची बातमी त्याला कळते. बातमीमूल्य लक्षात घेऊन तो त्याची बातमी कव्हर करतो, संवेदनशीलपणे जुम्मनला मदतही करतो. अत्यंत संयतपणे अभयनं ही भूमिका साकारली आहे. 'इलेक्ट्रॉनिक वाहिन्या कशा पद्धतीनं बातम्या दाखवतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, 'रंगा पतंगा'मधील रिपोर्टर हा वेगळा आहे. अतिशय संवेदनशीलपणे तो त्या घटनेकडे पाहतो. बातमी देतानाच शेतकऱ्याला मदत करण्याचाही प्रयत्न करतो. त्यामुळे ही भूमिका साकारणं हा छान अनुभव होता. तसंच मकरंद अनासपूरे, संदीप पाठक यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांसह काम करायला मिळणं ही उत्तम संधी होती,' अशी भावना अभयनं व्यक्त केली.