Join us  

असंतोषाविरुद्धचा एल्गार... ‘आसूड’ लवकरच रूपेरी पडद्यावर,'या' कलाकारांच्या असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 3:10 PM

समकालीन व्यवस्थेवर बोट ठेवताना व्यवस्था बदलासाठी देशातील तरुण पिढीनं राजकारणात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे हा संदेश ही नकळतपणे या चित्रपटातून देण्यात आला आहे.

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय प्रत्येकाने कमी अधिक प्रमाणात घेतलेला असेल. छोट्यातल्या छोट्या कामासाठी सुद्धा सामान्य माणसाला वर्षानुवर्षे सरकारी कचेऱ्यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात आणि यातूनच जन्म होतो तो भ्रष्टाचाराचा. गेली कित्येक वर्ष हे चक्र असंच सुरु आहे. पण या एका क्षणी या परिस्थितीविरोधात जनसामान्यांच्या असंतोषाचा विस्फोट होतो आणि मग त्यांच्यातलाच एखादा तरुण अभिमन्यूच्या रूपाने सरकारी व्यवस्थेचे भ्रष्ट चक्रव्यूह भेदू पाहतो तेव्हा त्याला कोण कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते याची विलक्षण कथा  ‘आसूड’ या राजकीय थरारपटाद्वारे प्रेक्षकांना आजपासून अनुभवता येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ. दीपक मोरे यांनी केली असून दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.

 

संघर्ष हा सामान्य माणसाच्या पाचवीला पुजलेला आहे. प्रत्येक पावलावर कराव्या लागणाऱ्या या संघर्षामुळे टोकाचा असंतोष निर्माण होतो आणि या असंतोषातच क्रांतीची बीजं दडलेली असतात. सरकारी अनास्थेविरोधात पेटून उठत, प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देत, त्याविरोधात बंड करणाऱ्या ‘शिवाजी पाटील’ नावाच्या तडफदार तरुणाची संघर्षकथा ‘आसूड’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मातब्बर राजकारणी, गडगंज व्यावसायिक आणि समाजजागृतीचा वसा घेतलेली प्रसारमाध्यमे यांचा खरा चेहरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या सामोर येणार आहे. शेतकरी कुटुंबात जन्माला येउनही शेतीबद्दल अनास्था बाळगणारा कथानायक शेतकऱ्यांच्या समस्या निवारण्यासाठी का उभा राहतो? भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असेल्या शेतकऱ्याला वाळवीप्रमाणे पोखरणाऱ्या व्यवस्थेला उलथून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना तो कशाप्रकारे प्रोत्साहन देतो याची चित्तथरारक कहाणी ‘आसूड’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही आघाडीची जोडी या चित्रपटात झळकणार आहेत. विशेष म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांनी ‘आसूड’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी संगीत दिले आहे. कथेच्या अनुषंगाने येणाऱ्या तीन गीतांना सोनू निगम, आदर्श शिंदे, दिव्या कुमार आणि अनमोल मलिक यांनी स्वरबद्ध केले आहे.

समकालीन व्यवस्थेवर बोट ठेवताना व्यवस्था बदलासाठी देशातील तरुण पिढीनं राजकारणात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे हा संदेश ही नकळतपणे या चित्रपटातून देण्यात आला आहे. 

या चित्रपटाची सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. आज ‘आसूड’ सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

टॅग्स :आसूड