Join us  

प्रभासच्या आदिपुरुष सिनेमात मराठमोळा अभिनेता झळकणार हनुमानच्या भूमिकेत, घेतोय इतक मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 8:00 AM

'आदिपुरुष' सिनेमात प्रभास प्रभु श्रीरामच्या भूमिकेत तर क्रिती सेनन माता सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सैफअली खान रावनची भूमिका साकारणार आहे.

'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतने 'आदिपुरुष' सिनेमाची घोषणा केली. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून वेगेवगळ्या कारणांमुळे सिनेमाची चर्चा होत असते. अजय देवगनसोबत ‘तान्हाजी’ या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शन केल्यावर ओम राऊतने ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत काम करणार असल्याचे सांगितले होते. 

पौराणिक कथा रामायण यावर हा सिनेमा आधारित आहे. यामध्ये भगवान रामची भूमिका प्रभास साकारताना दिसणार आहे. एका मुलाखतीत ओम राऊतने सांगितले होते की, जेव्हा त्याने या सिनेमात भगवान रामच्या भूमिकेबाबत विचार केला तेव्हा त्याच्यासमोर केवळ आणि केवळ प्रभासचा चेहरा आला होता. रामाची भूमिका प्रभासपेक्षा चांगली दुसरं कुणी करू शकणार नाही. ​प्रभास प्रभु श्रीरामच्या भूमिकेत तर क्रिती सेनन माता सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सैफअली खान रावनची भूमिका साकारणार आहे.

सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी कलाकारांना या सिनेमात संधी देण्यात आली आहे. सिनेमात अभिनेता अभिनय बेर्डेही झळकणार आहे. याविषयी अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अभिनयच्या एका पोस्टवरुन तो 'आदिपुरुष' सिनेमात झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. आता त्याचपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याची चर्चा सुरु झाली आहे.

हनुमानच्या भूमिकेसाठी कोणता कलाकार झळकणार याविषयीही चर्चा रंगल्या होत्या. तर 'जय मल्हार' फेम अभिनेता देवदत्त नागे हनुमानच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी देवदत्तही प्रचंड मेहनत घेत आहे. घराघरात पोहचलेला देवदत्त नागे रसिकांचाही आवडता अभिनेता आहे. नुकताच तो  'डॉक्टर डॉन' या मालिकेत झळकला होता. देवदत्त नागे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतो. सोशल मीडियावरही त्याा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांनाही तो प्रेरणा देत असतो.    

हा सिनेमा पाहण्याची रसिकांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. पुढच्या वर्षी २०२२ मध्ये सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदीशिवाय तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या चार दाक्षिणात्य भाषांमध्ये रसिकांना पाहता येणार आहे.

टॅग्स :प्रभासक्रिती सनॉन