Join us  

आदेश बांदेकरांनी घरच्या 'होम मिनिस्टर'ला दिली नाही एकही पैठणी? म्हणाले, 'लेबल पाहून..'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 2:03 PM

Aadesh bandekar: होम मिनिस्टरच्या २० वर्षाच्या प्रवासात आदेश बांदेकरांनी अनेक गृहिणींना पैठणी देऊन त्यांचा गौरव केला. मात्र, त्यांच्या पत्नीला सुचित्रा यांना एक तरी पैठणी दिली की नाही हे त्यांनी नुकतंच सांगितलं.

होम मिनिस्टर या गाजलेल्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर. जवळपास २० वर्षांपासून ते अविरतपणे हा कार्यक्रम करत आहेत. आजवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गृहिणींना महाराष्ट्राची शान म्हणून पैठणी साडी भेट म्हणून दिली. मात्र, या २० वर्षाच्या प्रवासात त्यांनी त्यांच्या पत्नीला अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांना कितीवेळा पैठणी गिफ्ट केली आहे, हे त्यांनी नुकतंच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

अलिकडेच आदेश बांदेकरांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक किस्से, प्रसंगांचा खुलासा केला. यावेळी त्यांनी पत्नी सुचित्रा हिच्याविषयीदेखील अनेक गोष्टी सांगितल्या.

“गेली २० वर्षे महाराष्ट्राच्या घराघरांत पैठणी घेऊन जाणाऱ्या आदेश बांदेकरांनी सुचित्रा यांना किती पैठण्या दिल्या?” असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर, “सध्या मी तिला साड्या घेतच नाही कारण, ती थेट मला बिलं आणून दाखवते. कारण, पैठणी साडी ही महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून ओळखली जाते. अशी ही पैठणी जेव्हा एखाद्या माऊलीच्या अंगावर जाते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं तेज हे खूप मोठं असतं. अगदी तसंच तेज माझ्याही घरात असावं असं मला वाटणं फारच स्वाभाविक आहे. त्यामुळे मी स्वत: जाऊन एक – दोनवेळा तिला पैठणी साडी विकत घेऊन दिली होती. पण, त्यानंतर आता ती स्वत: साड्या खरेदी करते आणि मला दाखवते,” असं आदेश बांदेकर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “लग्न केलं तेव्हा मी सुचित्राला काहीच देऊ शकत नव्हतो. पण, त्यावेळी मी एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे, प्रामाणिकपणाच्या जोरावर मी माझी अशी परिस्थिती तयार करेन की, कधीच तुला लेबल पाहून वस्तू विकत घ्यावी लागणार नाही. त्यासाठी आज मला २५ वर्षे मेहनत घ्यावी लागली आणि आता आमच्या संसाराला एकूण ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण एकदा स्वच्छ कामाचा मार्ग निवडला की, आपल्याला पुन्हा मागे वळून पाहावं लागत नाही.”

टॅग्स :आदेश बांदेकरसेलिब्रिटीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता