Join us  

'३ इडियट्स' फेम ओमी वैद्यची भन्नाट मराठी, 'आईच्या गावात मराठीत बोल' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 9:30 AM

Aaichya Gavat Marathit Bol : 'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते हसून लोटपोट होणार आहेत.

कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन हीच एक अफलातून बाब असते आणि अशा मराठी चित्रपटात जर जबरदस्त असा नैसर्गिक आणि खळखळून हसवणारा विनोद असेल तर चित्रपटाचे प्रदर्शन होण्याआधीच त्याची धमाल चर्चा सुरु होते. असाच एक मराठी चित्रपट आहे 'आईच्या गावात मराठीत बोल' (Aaichya Gavat Marathit Bol Movie). आईच्या गावात मराठीत बोलचे ट्रेलर आणि संगीत अनावरण मुंबईमध्ये सर्व  कलाकार, तंत्रज्ञ आणि मिडीया यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. 'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते तद्दन खूश आणि हसून लोटपोट होणार आहेत. याला ओमीच्या नव्या भाषेचा चमत्कार म्हणायचे की विनोदाची एक नवी भाषा म्हणायचे हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे.

ट्रेलरमध्ये चित्रपटाचा नायक, समर (ओमी वैद्य), परदेशात राहणारा एक खोडकर तरुण परिस्थितीच्या दवाबामुळे  लग्नासाठी सुयोग्य मराठी वधू  शोधण्याच्या आशेने भारताच्या प्रवासाला निघतो. तथापि,  नशिबाप्रमाणे  समरच्या आयुष्याला एक गमतीदार वळण लागते कारण त्याला या प्रवासात अनेक आनंददायक तसेच विलक्षण प्रसंगांचा  सामना करावा लागतो. हा प्रवास त्याला एक जीवनाच्या एका वेगळ्या वाटेवर नेऊन ठेवतो जिथे त्याला प्रेम, कौटुंबिक मूल्ये अशा अनेक गोष्टींचा अनुभव मिळतो.

चित्रपटातील गाणी

आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटाची गाणी व्हिडिओ पॅलेस सादर करत आहे तर संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश विश्वजीत यांचे आहे.  आईच्या गावात मराठीत बोल या शीर्षक गीताचे धमाल बोल वैभव जोशी यांनी लिहीले  आहेत. ठेका धरायला भाग पाडणाऱ्या या गीताला स्वप्निल बांदोडकर, विश्वजीत जोशी, मनीष राजगिरे आणि रोहित राऊत यांनी अस्सल मराठी आवाज दिला आहे. तू हवीशी’ हे गाणे विश्वजीत जोशी यांनी लिहले आहे  तर ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गाणं कॉमेडीची मेजवानी असलेल्या चित्रपटात सुद्धा रोमॅंटीक माहोल तयार करत आहे.

'आईच्या गावात मराठीत बोल'चे शीर्षक गीत चित्रपटाला शोभेल असे विनोदी पण तितकेच अर्थपूर्ण असे आहे अशी भावना संगीतकार अविनाश विश्वजीत यांनी व्यक्त केली. ओमी वैद्य आणि अमृता हर्डीकर यांनी  या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहीले आहेत. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळले आहे , तर संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी सांभाळले आहे. ओमी वैद्य आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारतो आहे त्याची उत्तम अभिनयाची छाप कायम असताना चित्रपटाच्या ट्रेलर मधून  त्याची दिग्दर्शनाची बाजू भक्कम आहे हेही दिसते आहे. त्याचा आणि सहकलाकारांचा चित्रपटातील सहज वावर प्रेक्षकांची मने निश्चित जिंकू शकेल असा आहे.

'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव आहेत तसेच विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, सायली राजाध्यक्ष आणि सुधीर जोगळेकर यांच्या ही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ.जलदीप दलूत, पीट टॉरमे, नंदिनी मिनॉशे, सामिया अश्रफ, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मॉंटी आणि तनु पांडे, संतोष गोविंदराजू, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, जसलीन अहलुवालिया, राजन वासुदेवन, राजीव आणि शीतल शाह, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे आणि उदय कुमार यांनी केली आहे. 'आईच्या गावात मराठीत बोल' हा चित्रपट येत्या १९ जानेवारीपासून प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :ओमी वैद्य संस्कृती बालगुडे