Join us  

बारावीत नापास होऊनही हा अभिनेता आज करतोय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 10:14 AM

या अभिनेत्याने आज मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. 

ठळक मुद्देप्रेक्षकांचा लाडका सुबोध बारावीच्या परीक्षेत नापास झाला होता. त्याने गेल्या वर्षी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले होते. त्याने सांगितले होते की, मी बारावीत नापास झालो नसतो तर बहुधा आज मिळालेले यश मला मिळालेच नसते.

सुबोधचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म ९ नोव्हेंबर १९७५ ला पुण्यात झाला. त्याने त्याचे शिक्षण पुण्यातील सिम्बोसिस कॉलेजमधून पूर्ण केले. त्याने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी एका आयटी कंपनीत सेल्समनचे काम देखील केले होते. सुबोध भावेने आज मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. 

सुबोधने कॉलेज जीवनापासूनच एकांकिकामध्ये काम करायला सुरुवात केली. त्याला त्यावेळी अनेक पारितोषिकं देखील मिळाली होती. त्याने अभिनय करण्यासोबतच दिग्दर्शन देखील केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेला कट्यार काळजात घुसली हा चित्रपट चांगलाच गाजला होता.

सुबोधने आज मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक खास जागा निर्माण केली आहे. तो एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक देखील आहे. त्याने मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सुबोध आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असला तरी त्याच्यासाठी हे यश मिळवणे सोपे नव्हते. त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर आज मराठी चित्रपटसृष्टीत त्याची जागा निर्माण केली आहे. तुम्हाला माहीत आहे का, हे यश मिळण्याआधी सुबोधने अनेक अपयशं पचवलेली आहेत. 

प्रेक्षकांचा लाडका सुबोध बारावीच्या परीक्षेत नापास झाला होता. त्याने गेल्या वर्षी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले होते. त्याने सांगितले होते की, मी बारावीत नापास झालो नसतो तर बहुधा आज मिळालेले यश मला मिळालेच नसते. मी बारावीत पास झालो असतो तर इतरांप्रमाणे मी देखील बीएस्सी अथवा बीई केले असते आणि कुठेतरी नोकरी करत असतो. पण माझ्या नापास होण्यानेच माझे आयुष्य संपूर्णपणे बदलले. मला मिळालेल्या या अपयशामुळे आता मला नापास होण्याची भीती राहिलेली नाही. तसेच त्याचमुळे आता मी प्रयोग करायला देखील घाबरत नाही. एखादा प्रयोग चुकला तर मी नापास होईल याची मला भीती नसते. कारण मी आयुष्यात एकदा नापास झालेलो आहे. मी नापास झालो म्हणूनच मला काठावर पास करणारी मंडळी माझ्या आयुष्यात आली असे मला नेहमीच वाटते.

टॅग्स :सुबोध भावे