Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या 'बिग बॉस'मध्ये झाला 'मराठी बिग बॉस'चा वाद, शिव ठाकरेचा Video व्हायरल; खरंच पक्षपात झाला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 18:40 IST

सलमान खान सुत्रसंचलन करत असलेल्या हिंदी बिग बॉसमध्ये नुकतंच विकास मानकतला वाइल्ड कार्ड म्हणून घरात दाखल झाला.

हिंदी 'बिग बॉस'चं सध्या १६ वं सीझन सुरू आहे. पण या सीझनमध्ये 'मराठी बिग बॉस'ची चर्चा सुरू आहे. याचं कारण ठरला आहे सध्या हिंदी बिग बॉसच्या घरात स्पर्धक असलेला मराठी बिग बॉस सीझन २ चा विजेता शिव ठाकरे. सलमान खान सुत्रसंचलन करत असलेल्या हिंदी बिग बॉसमध्ये नुकतंच विकास मानकतला वाइल्ड कार्ड म्हणून घरात दाखल झाला. त्यानं घरातील सदस्यांना शिव ठाकरेबाबत बिग बॉस मराठीत घडलेली एक अशी घटना सांगितली की ज्यानं बिग बॉसवरच थेट पक्षपातीपणाचा अप्रत्यक्षरित्या आरोप केला गेला. मग खुद्द 'बिग बॉस'नंच याची दखल घेत विकास याला सर्वांसमोर झापलं. पण या घटनेनंतर सोशल मीडियात शिव ठाकरेबाबत बोलल्या गेलेल्या 'मराठी बिग बॉस'मधील त्या वादग्रस्त प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

मराठी बिग बॉसच्या सीझन २ मध्ये एका टास्क दरम्यान शिव ठाकरे यानं आरोह वेलणकर याच्या हाताचा चावा घेतला होता. यानंतर घरात एकच गहजब झाला होता आणि शिव ठाकरे याला थेट नॉमिनेट करण्यात आलं होतं. पण त्यावेळी आरोह वेलणकर यानं शिव ठाकरे याला माफ केलं होतं. त्यामुळे शिव ठाकरेवर घरातून बाहेर पडण्याची वेळ आली नव्हती. 

आता हिंदी बिग बॉसमध्ये काय घडलं?वाइल्ड कार्ड म्हणून घरात दाखल झालेल्या विकासनं अर्चना गौतम हिला शिव विरोधात माहिती देताना मराठी बिग बॉसमध्ये घडलेल्या या प्रसंगाची माहिती दिली. "शिव बिग बॉस मराठीमध्ये असताना एका स्पर्धकाला चावला होता. बराच गदारोळ झाला होता. त्यावेळी बिग बॉसनं शिवला बाहेर काढण्याचा निर्णय स्पर्धकांवर सोडला होता. त्यावेळी शिवला माफ करण्यात आलं होतं. पण जेव्हा तुझ्यासोबत हाच प्रसंग घडला तेव्हा शिवनं तुला माफ केलं नाही. त्यानं तुला हाकलून देण्याचा निर्णय घेतला", असं विकासनं अर्चाना गौतम हिला सांगितलं. यानंतर अर्चना चांगलीच संतापलेली दिसली आणि तिनं जाऊन शिव ठाकरेला याबाबत जाबही विचारला. 

इतकंच नव्हे तर विकास यानं ही घटना अर्चनासोबतच प्रियांक चाहर चौधरी, टीना दत्ता आणि शालीन भनोट यांनाही सांगितली. शिव खूप सभ्य असल्याचा आव आणतो आणि गेम खेळतो, असा आरोप विकासनं केला. दरम्यान अर्चना गौतम हिनं जाब विचारल्यानंतर शिव ठाकरेनं तिचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला पण ती काही शांत झाली नाही. मग खुद्द बिग बॉसनंच पक्षपातीपणाचा आरोप होत असल्याचं निदर्शनास येताच सर्वांना लिविंग एरियामध्ये बोलावून संपूर्ण स्पष्टीकरण दिलं. तसंच अपूर्ण माहिती दिल्याबाबत विकास याला झापलं. 

आता शिवचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो टास्कदरम्यान आरोहला चावताना दिसत आहे. आरोहच्या हातावर दातांची खूणही आहे. मात्र नेमकं काय घडले हेही आरोह व्हिडिओत सांगताना दिसतोय. त्यानं शिवला माफ केलं होतं जेणेकरुन शिवला कोणत्याही प्रकारची सहानुभूती मिळू नये.

टॅग्स :बिग बॉसशीव ठाकरे