Join us  

"हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?", राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:22 PM

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनयाचा ठसा उमटवून मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांत काम करून तेजस्विनीने प्रेक्षकांची मनं जिंकली. तेजस्विनी अभिनयाबरोबरच तिच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. अनेक विषयांबरोबरच ती राजकारणावरही उघडपणे बोलताना दिसते. सध्या तेजस्विनीची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. 

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, "१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला माणूस भारतीय होतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी गेली की तो बंगाली, गुजराती, तामिळ सर्वकाही होतो. मग एके दिवशी तो जेव्हा मराठा होतो तेव्हा मराठा, ब्राह्मण, कुणबी, कोळी असा सगळा होतो. 'फादर्स डे', 'मदर्स डे' सारखे आपणही डे वाटून घेतले आहेत. दंगलीत 'हिंदू डे', १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला 'भारतीय डे', एरव्ही 'मराठी डे' आणि झालाच तर आमच्या 'जातीचे डे'...आपल्याला एक ठेवणारी कोणती गोष्ट असेल तर मला वाटतं ती आपली मराठी भाषा." 

मनसेच्या ऑफिशिअल सोशल मीडिया हँडलवरुन राज ठाकरेंचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्मापलीकडे एकत्र बांधलेल्या रयतेची वज्रमूठ कोण कमकुवत करतंय?", असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीने "हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?", असं म्हटलं आहे. तेजस्विनीच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 

तेजस्विनीने याआधी अनेकदा राज ठाकरे आणि राजकारणाबद्दल तिचं मत मांडलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोलबाबतचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे आपलं दुर्देव असल्याचंही तेजस्विनी म्हणाली होती. 

टॅग्स :तेजस्विनी पंडितराज ठाकरेमनसे