Join us

मराठी सिनेसृष्टीतील ही अभिनेत्री बनली फोटोग्राफर, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 07:15 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री आता फोटोग्राफर बनली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसणारी मुक्ता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. मुक्ता तिच्या आगामी 'स्माईल प्लीज' या चित्रपटात एका यशस्वी फोटोग्राफरची भूमिका साकारत आहे. ही भूमिका अधिक नैसर्गिक वाटावी यासाठी तिने फोटोग्राफीसाठी आवश्यक गोष्टी आत्मसात केल्या आहेत. कॅमेरा हाताळताना शरीराची ठेवणं कशी असावी इथंपासून ते फोटो काढण्यापर्यंत सर्वच गोष्टी ती शिकली. 

मुक्ता तिच्या फोटोग्राफीच्या अनुभवाबद्दल सांगताना म्हणते, "फोटोग्राफी हे माध्यम असे आहे की, यात भाषेची नाही तर चांगल्या दृष्टीची आवश्यकता असते. मी यापूर्वी कधीही कॅमेरा हाताळला नव्हता पण या चित्रपटाच्या निमित्ताने मला काही अंशी फोटोग्राफी शिकता आली. सारखा कॅमेरा हातात असल्यामुळे आता मला सुद्धा फोटोग्राफीची आवड निर्माण झाली."

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित  'स्माईल प्लीज' हा चित्रपट विक्रम फडणीस यांनी दिग्दर्शित केला आहे.

 येत्या १९ जुलै रोजी 'स्माईल प्लीज' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमात मुक्ता सोबतच प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, सतीश आळेकर, तृप्ती खामकर, वेदश्री महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :मुक्ता बर्वे