Join us  

'कळवा स्टेशनवर एकाने मला...' हेमांगी कवीने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "त्याची कॉलर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:43 PM

नवरात्रीनिमित्त लोकमत फिल्मीशी बोलताना हेमांगी म्हणाली,...

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी आता प्रत्येक स्त्रीने दुर्गा होण्याची गरज आली आहे. आणि ते दुर्गा होणं म्हणजे काय तर आजच्या जगात स्त्रीनेच कायदा हाताता घेण्याची गरज आहे असं स्पष्ट मत मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) व्यक्त केलं आहे. नवरात्रीनिमित्त तिने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला.

अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. सामाजिक विषय विशेषत: महिलांच्या बाबतीतील विषयांवर ती खुलेपणाने संवाद साधते. सोशल मीडियावरही व्यक्त होत असते. नवरात्रीनिमित्त लोकमत फिल्मीशी बोलताना हेमांगी म्हणाली,'फक्त सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतानाच नाही तर अगदी सुरक्षित ठिकाणी, सेटवरही अनेकदा महिलांना विचित्र अनुभव येतात. त्यावेळी आपण कसं रिएक्ट करतो हे खूप महत्वाचं असतं. मला जर कोणी हात लावून गेलं तर काय ए...असं मी विचारतेच. नको ना जाऊ दे ना वगरे असं मी आधीही करत नव्हते. मी माझ्या सुरक्षेसाठी कधी कधी कायदा हातात घेतला आहे असं मी म्हणेन.'

ती पुढे म्हणाली,"एकदा कळवा स्टेशनवर मला एक जण मानेला हात लावून गेला. तर मी बरोबर त्याच्या कॉलरला पकडलं आणि त्याला लगावली. तेव्हा मला असं झालं की मी नक्की काय केलं. तर मला जाणवलं मी माझ्या सुरक्षेसाठी कायदा हातात घेतला. पण त्याक्षणी स्वत: तसं वागणं खूप गरजेचं होतं. हे मी आधीही करायचे आणि आताही करते. कोणी माझ्याकडे वाईट नजरेने जरी बघितलं ना तरी मी 'क्या है...' असं विचारते."

नवरात्रीनिमित्त हेमांगी कवीने सर्वच महिलांना चांगला संदेश दिला आहे. कुठे ना कुठे मुलींना/स्त्रियांना विचित्र अनुभव आले आहेत. अनेकदा मुली जाऊदे म्हणत सोडून देतात. मात्र तिथल्या तिथे त्या माणसाला धडा शिकवणं खूप गरजेचं असतं हे हेमांगीने तिच्या या मुलाखतीतून शिकवलं आहे. 

हेमांगी कवी नुकतंच 'ताली' या वेबसिरीजमध्ये दिसली. तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. 'जन्मवारी' या नाटकात सध्या ती काम करत आहे.

टॅग्स :हेमांगी कवीमराठी अभिनेताकळवामुंबई