Join us  

मानस व वैदेहीच्या विवाह सोहळ्यात ह्या व्यक्तींमुळे येणार विघ्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 11:55 AM

मानस आणि वैदेहीच्या नात्यातील अनेक चढउतारांनंतर ते दोघेही २९ जुलैला लग्नबेडीत अडकणार आहेत.

ठळक मुद्देअखेर मानस आणि वैदेही यांची लग्नघटिका समीप आली

झी युवा वाहिनीवरील फुलपाखरू मालिकेतील मानस आणि वैदेही ही आजच्या तरूणाईची आवडती जोडी बनली आहे आणि या मालिकेतील त्यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. आता मानस आणि वैदेहीच्या नात्यातील अनेक चढउतारांनंतर ते दोघेही २९ जुलैला लग्नबेडीत अडकणार आहेत. प्रेक्षकदेखील २९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता हा अभूतपूर्व विवाहसोहळा अनुभवू शकतात.

लग्नाची खरेदी, मेहंदी, संगीत, व्याहीभोजन, हळद या सर्व समारंभानंतर अखेर मानस आणि वैदेही यांची लग्नघटिका समीप आली आहे. दोन्ही घरातील कुटुंबीय आणि मित्र परिवार लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. मानस आणि वैदेहीची कॉलेज गॅंग सर्व तयारीकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. तसेच मालिकेत नुकतीच एंट्री झालेली हेमांगी कवी म्हणजे मानस आणि वैदेहीची योगा टीचरशाल्मली मॅडमदेखील वैदेहीची मदत करण्यासाठी तत्पर आहे. वैदेही आणि मानस जितके खुश आहेत तितकेच नर्वस देखील आहेत. वैदेही वधूच्या गेटअपमध्ये अतिशय सुंदर आणि सोज्वळ दिसते आहे. अगदी दृष्ट लागेल अशा या नवरीला मानस तिच्या खोलीत लपून भेटायला जातो. वैदेही तिच्या तयारीमध्ये व्यस्त असते पण जेव्हा तिला कळते की मानस तिला भेटायला आला आहे तेव्हा ती त्याला कोणी बघायच्या आत त्याला तिथून जायला सांगते. वैदेहीच्या मैत्रिणी म्हणजेच तिच्या करवल्या देखील तिची काही पाठ सोडत नाहीत आणि मानसला तिथून बाहेर काढण्यात त्या यशस्वी होतात. सर्व आनंदी वातावरणात मिठाचा खडा मिसळायला काही विघ्नसंतोषी माणसेदेखील या लग्नसोहळ्यात सामील होणार आहेत. माया व मानसच्या कुसुम आत्याचा नवरा या लग्नसोहळ्यात गोंधळ घालताना दिसणार आहेत. त्यामुळे मानस व वैदेही यांच्या लग्नात कोणतीही बाधा येते की नाही व लग्न नीट पार पडते का, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा विवाहसोहळा पाहावा लागेल.

टॅग्स :फुलपाखरू