Join us  

राम'मय' झाली अवघी मुंबई! गेटवे ऑफ इंडियाला पार पडलं गीतरामायण; सियारामच्या भूमिकेत होते 'हे' मराठी कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 11:28 AM

नुकतंच महाकाव्य रामायणाच्या कार्यक्रमाचं गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजन करण्यात आलं होतं.

अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा  २२ जानेवारीला पार पडला. ऐतिहासिक सोहळ्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं.  अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर प्रभू राम आल्याने देशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. देशभरात विविध ठिकाणी महाकाव्य रामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. नुकतंच मुंबई जय श्री रामाच्या घोषणांनी न्हाऊन निघाली.

नुकतंच महाकाव्य रामायणाच्या कार्यक्रमाचं गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजन करण्यात आलं होतं. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी 'स्वयें श्रीराम प्रभू ऐकती, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला ग सखे, चला राघवा चला, स्वयंवर झाले सीतेचे', अशा अजरामर गीतांचे सादरीकरण करुन उपस्थितांना मोहिनी घातली.

महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेता ललित प्रभाकरने प्रभू श्रीरामांची, मृण्मयी देशपांडेने सीतामातेची, तर लक्ष्मणाची भूमिका अभिनेता शुभंकर परांजपेने साकारली होती. याशिवाय रामायणातील प्रसंग सादर करताना अभिनेता नकुल घाणेकरने रावणाची, तर अभिजीत केळकरने अग्निदेवाची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमात सगळ्याच मराठी कलाकारांनी लक्ष वेधून घेतलं होतं. 

गीत, नाट्य, नृत्य आणि वादनाच्या माध्यमातून रामायणातील एकेका प्रसंगाचे अलवारपणे सादरीकरण झाले. यावेळी अभिनेत्री रवीना टंडन, अदा शर्मा, डेसी शाह, शांती प्रिय, जिया शंकर, अभिनेते अरुण गोविल, अमर उपाध्याय, शिव ठाकरे आदी कलाकार उपस्थित होते. रामायण हे एक असे महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय देते. या महाकाव्यातील प्रसंगाचे सादरीकरण पाहण्याची संधी रसिकांना मिळाली हा एक वेगळाच आनंद होता. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीमृण्मयी देशपांडेरामायणमुंबईमहाराष्ट्रललित प्रभाकर