Join us  

मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांचं नवं कोर नाटक येणार लवकरच रंगभूमीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 5:13 PM

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आणि अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आणि अभिनेते तुषार दळवी मराठी रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. विजय केंकरे दिग्दर्शित 'आपण यांना पाहिलंत का?' या नव्याकोऱ्या नाटकात मधुरा आणि तुषार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

वरदा-वैध निर्मित प्रवेश प्रकाशित या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. आपल्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागू नये असं चाळीशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जोडप्याला वाटत असतं. संसारात एकत्र आहोत म्हणजे सगळं शांत आणि निवांत. असं खरच असतं? अश्यातच अचानकपणे त्यांच्या आयुष्यात आणि घरात एक  वादळ प्रवेश करतं. या वादळाच्या येण्यानं त्या जोडप्याच्या नात्याचं, त्यांच्या संसाराचं काय होतं? याची नर्म विनोदी गोष्ट 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकाद्वारे आपल्या अनुभवास येणार आहे. तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर साटम यांच्यासह विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अजित परब यांनी नाटकाचं संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना, मंगल केंकरे यांनी वेशभूषा, संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची जबाबदारी निभावली आहे. 

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीनं आजच्या काळावर ते नाटकातून भाष्य करतात. आता तुषार दळवी, मधुरा वेलणकर साटम, विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांना घेऊन 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकात विजय केंकरे मराठी नाट्यप्रेमींना काय नवीन अनुभव देतात याची उत्सुकता आहे. 

टॅग्स :मधुरा वेलणकर