Join us

मधुकर तोरडमल…! मराठी रंगभूमीवरचा सिंह…!

By admin | Updated: July 3, 2017 16:06 IST

"मरण हे जगण्याचे ध्येय नाही. कर्तव्य करत आनंदाने जगणे हे जगण्याचे खरे ध्येय आहे"

राज चिंचणकर/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - मधुकर तोरडमल…! मराठी रंगभूमीवरचा सिंह…!  आपल्या तीक्ष्ण नजरेने जरब बसवणारा… तर कधी मनमोकळ्या हास्याची ओंजळ रसिकांच्या पदरात घालणारा… कधी वकृत्वातून थेट मनाला भिडणारा… तर कधी लेखणीतून उतरलेल्या शब्दांचे गारुड वाचकांवर करणारा… अशा अनेकविध रूपांत मामा तोरडमल मराठी नाट्यवेड्या रसिकांना आणि वाचकांना गेली अनेक दशके भरभरून देतच आले. "काळं बेट लाल बत्ती"मधल्या इंद्रसेन आंग्रेची भेदक नजर असो किंवा "तरुण तुर्क…"मधला "ह"ची बाराखडी उगाळणारा प्राध्यापक बारटक्के असो; मामांची देहबोली आणि सुस्पष्ट शब्दोच्चारांनी रसिकांवर गारुड केले. "गुड बाय डॉक्टर" मधला डॉक्टर, "बेईमान" मधला धनराज, "अखेरचा सवाल" मधला देवदत्त, "मत्स्यगंधा"तला भीष्म, "सौभाग्य" मधला मामा, "आश्चर्य नंबर दहा" मधला प्रोफेसर या व अशा अनेक भूमिकांसह "गगनभेदी", "ऋणानुबंध", "झुंज", "भोवरा" अशा विविध नाटकांतून मामा रसिकांना सर्वार्थाने भेटले. नाटककार म्हणून ओळख असलेल्या मामांचे चरित्रलेखन हा सुद्धा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणावा लागेल. "आयुष्य पेलताना", "तिसरी घंटा", "उत्तरमामायण", "रंगरूपदर्शन" अशी चौफेर लेखणी मामांनी चालवली. एवढेच करून मामा थांबले नाहीत; तर मूळचे इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या मामांनी र.धों.कर्वे यांच्या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले. अगाथा ख्रिस्ती यांच्या अनेक कादंबऱ्यांचे केलेले अनुवाद मामांचा एक वेगळाच पैलू समोर ठेवतात. 
 
मुळात मामांची जडणघडण आणि त्यांच्या नाट्यसृष्टीतल्या कारकीर्दीचा तसा काही संबंध येण्याची शक्यता नव्हती. समृद्ध अशा इनामदार घराण्यात मामांचा जन्म झाला आणि त्या घराण्यातली परंपरा पाहता शिकार किंवा शेती हा उद्योग किंवा नोकरी केलीच, तर लष्करात हे नक्की होते. पण मामांनी यातले काहीच केले नाही, कारण मध्यंतरीच्या काळात या वैभवाला दृष्ट लागली आणि मामांना शिकून कुठेतरी नोकरी करण्याला पर्याय उरला नाही. मामांना प्राध्यापक होण्याचाच नव्हे, पण नट होण्याचाही तिटकारा होता. मात्र मामा प्राध्यापकही झाले आणि नट सुद्धा झाले. कालांतराने मामा लेखक, नाटककार आणि निर्मातेही झाले. मामा तापट स्वभावाचे, पण वाढत्या वयानुसार त्यांचा हा स्वभाव बदलत गेला. मामांना सतत भूक होती ती आनंदाची आणि त्यांनी हा आनंद विपुल वाचनातून मिळवला. त्यांनी मराठी लेखक-कवी तर वाचलेच; परंतु जागतिक नेत्यांची चरित्रेही वाचून काढली. मामा केवळ स्वत:च्या आनंदासाठीच वाचत गेले. त्यानंतर त्यांना इंग्रजी चित्रपट पाहण्याचा लळा लागला आणि त्यांना परदेशी अभिनयाची गोडी चाखायला मिळाली. चित्रकला, वक्तृत्व, व्याख्याता असे उद्योग मामांनी आवडीने केले आणि मामांचे अनेक छंदच व्यवसायात रुपांतरीत होत गेले. 
 
मामांनी अनेक भूमिका त्यांच्या त्या खास "तोरडमल टच"ने गाजवल्या, पण त्यातही "तरुण तुर्क म्हातारे अर्क" हे मामांचे "ऑल टाईम हिट" असे सदाबहार नाटक…! उगाच नाही; मामांनी या नाटकातली "प्राध्यापक बारटक्के" यांची भूमिका करायची सोडल्यावर अनेक रंगकर्मींना ही भूमिका करण्याचा मोह आवरला नाही. मामांचे आणि बारटक्केंचे अतूट असेच नाते आहे. नगरमधल्या महाविद्यालयीन जीवनात प्रोफेसरांच्या फिरक्या उडवणारे मामा म्हणजे शिक्षकांसाठी तसा त्रासदायक प्रकार होता, हे सांगूनही खरे वाटणार नाही. पण आज इतक्या वर्षांनंतर मामा दिलखुलासपणे सांगून टाकतात, की वर्गात बसण्यापेक्षा ते वर्गाबाहेरच जास्त असायचे. "तरुण तुर्क…"मधला प्यारेलाल हा प्रत्यक्षात मामांच्या रूपाने त्याकाळी महाविद्यालयात धमाल करत होता. "बारटक्के" हे मात्र अनेक नमुन्यांचे एकत्रीकरण आहे. त्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रीयन-ख्रिश्चन असे त्यांना एक शिक्षक होते. जाडजूड, पोट पुढे आलेला असा तो इसम होता. अगदी गबाळग्रंथी असा तो कारभार होता. मामा त्यांची खूप चेष्टा करायचे. ते ज्ञानेश्वरी शिकवायचे आणि मामा वर्गात उभे राहून त्यांनाच सांगायचे की एकदा तरी ज्ञानेश्वरी म्हणा की…! मात्र ते काही त्यांना प्रत्यक्षात उतरवता यायचे नाही. हा माणूस मराठी शिकवतो कशाला, असा मामांना प्रश्न पडायचा, पण ते कॉंलेजच अमेरिकन-ख्रिश्चन पद्धतीचे असल्याने मामांचा नाईलाज व्हायचा. 
 
मामा त्याकाळात कॉंलेज सेक्रेटरी होते. कॉलेजमध्ये त्यांचे नाटकाचे उद्योग चालायचे, पण नाटक सुरु असताना काही व्रात्य मुले धिंगाणा घालायची. म्हणून मामांनी एका गुंड प्रवृत्तीच्या मुलाला हाताशी धरून ठेवले होते. नाटक संपल्यावर हा मुलगा त्या खोडकर मुलांना बदडायचा. याच्यासारखाच एक स्त्रैणवृत्तीचा मुलगा कॉलेजमध्ये होता. घरात त्याच्या आधी सहा-सात बहिणी होत्या आणि त्यांच्यानंतर झालेल्या या मुलाचा वावर सतत त्या बहिणींमध्ये असल्याने त्याच्या वृत्तीवर थोडा परिणाम झाला होता. मामांसाठी हे नमुने म्हणजे पर्वणीच ठरली आणि हे नमुने मग "तरुण तुर्क…"मध्ये अवतीर्ण झाले. मामांचे भूगोलाचे प्राध्यापक कुलकर्णी, एकदा मामांकडे आले आणि म्हणाले, "आय हेट अहमदनगर. मी इथे नोकरी करतोय आणि लग्नासाठी मुलगी बघतोय, पण मला एकही स्थळ चालून आले नाही". मग मामांनी ती जबाबदारी अंगावर घेतली. त्यावर ते मामांवर भडकले आणि नगरच्या मुलीपेक्षा सुंदर मुलीशी मी लग्न करणार, असे त्यांनी मामांना ठासून सांगितले. पण काही काळाने त्यांनी एका सर्वसाधारण मुलीशी लग्न केले. स्टाफरूममध्ये एकदा ते मामांना म्हणाले, "माझी बायको प्रेग्नंट आहे. त्याचे काय आहे, लग्नानंतर ९ महिन्यांत मूल झाले पाहिजे, नाहीतर लोक आपल्यावर संशय घेतात". मामा या सगळ्याचे अवलोकन करत होतेच. या दोन प्राध्यापकांचे मिश्रण म्हणजेच मामांचा "बारटक्के" हा नमुना…! चिकटे नावाचे एक मामलेदार होते आणि त्यांच्यावरून मामांना थत्तेकाका सुचले. असे बरेच नमुने मामांकडे जमत गेले आणि "तरुण तुर्क…" मामांच्या मनात आकार घेत गेले. एकदा मामलेदारांकडे मामा त्यांच्या मोठ्या भावासोबत गेले असताना, मामलेदार चक्क "ह"च्या बाराखडीत बोलत असल्याचे मामांनी टिपले. "ह"ची भाषा मामांना काही समजली नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावाला त्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, "संदर्भ लावत गेलो तर सगळे समजते". इथेच मामांना "तरुण तुर्क…"मधल्या "ह"च्या बाराखडीची ओळख झाली आणि तिथून घरी आल्यावर मामांनी त्याचे प्रसंगात रुपांतर करून ती थेट कागदावर उतरवली. 
 
मामांनी "तरुण तुर्क…"मधला "प्राध्यापक बारटक्के" तब्बल तीन हजार प्रयोगात रंगवला. पण त्यांनी ही भूमिका करायचे सोडल्यावर "बारटक्के" रंगवणार कोण असा प्रश्न निर्माण झाला. बरे, मामा तसे कडक शिस्तीचे…! त्यामुळे जो कुणी ही भूमिका करेल, त्याने एक पाऊलही वाकडे टाकायचे नाही आणि स्वत:च्या मनातला ब्र सुद्धा घालायचा नाही, अशी मामांची सक्त ताकीद…! अर्थाचा अनर्थ होऊ नये, म्हणून मामांनी घेतलेली ही काळजी होती आणि भूमिकेला कडक शिस्त असावी, यासाठी मामांचा हा अट्टहास होता. पुढे मामांच्या देखरेखीखाली बऱ्याच जणांनी "बारटक्के" रंगवला. "तरुण तुर्क…"चा पहिला प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात ५ ऑक्टोबर १९७२ रोजी झाला आणि त्यानंतर या नाटकाला "हाऊसफुल्ल"चा बोर्ड सतत झळकत राहिला. पण एकदा विश्राम बेडेकर यांनी हा प्रयोग पाहिला आणि त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली. आता काय करायचे हे मामांना कळेना. मग दामू केंकरे यांच्यामार्फत त्यांनी बेडेकरांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी बेडेकरांचे शिष्य असलेल्या दत्ता भट यांना मामांनी त्यांच्याकडे पाठवले. लेखकाला नाटक समजलेले नाही, एवढेच बेडेकर भटांना म्हणाले. या घटनेनंतर मामा पुनः पुन्हा हे नाटक वाचत गेले आणि नाटकाचा शेवट त्यांनी अखेरीस बदलला. या नाटकाची निर्मिती बऱ्याच संस्थांनी केली. या प्रवासात अनेकदा कटू प्रसंगांनाही मामांना सामोरे जावे लागले. "नाट्यमंदार", "चंद्रलेखा", "सुयोग" अशा नामवंत नाट्यसंस्थांसह मामांची "रसिकरंजन" ही नाट्यसंस्था ही या प्रवासातली ठळक नावे म्हणावी लागतील. अभिनेते उपेंद्र दाते त्यांच्या "रंगमंच" या संस्थेतर्फे सध्या या नाटकाचे प्रयोग करत असून, मामांचा वसा त्यांनी पुढे सुरु ठेवला आहे.  
 
खरे तर, नाटककाराच्या भूमिकेपेक्षा मामा नाटकाच्या रंगावृत्तीत अधिक रंगले. नाटककारापेक्षा त्यांच्यातला नट आणि दिग्दर्शकच अधिक ताकदवान ठरला आहे. "काळे बेट लाल बत्ती"मधले मानवी क्रौर्य, "भोवरा"मधला सामाजिक आविष्कार, "आश्चर्य नंबर दहा"मधला सुखाचा शोध, "झुंज"मधली समस्या, "ऋणानुबंध"मधल्या अपंगत्वाचा तणाव दाखवताना मामांच्या अंतरंगातला नट आणि दिग्दर्शक प्रभावी ठरत गेला आहे. मराठी नाट्यसृष्टीचा चालताबोलता इतिहास आणि वर्तमान असलेल्या मामांना इतक्या वर्षांच्या काळातही, मराठी रसिक मात्र तोच आणि तसाच असल्याची खात्री आहे. काळाच्या ओघात मराठी रसिकांची अभिरुची वगैरे बदलली आहे, असे काही मामांना वाटत नाही. ते म्हणतात, "इट इज जनरेशन ऑफ जनरेशन्स; द नेचर रिमेन्स द सेम".  
 
रंगभूमीवर विविध नाटकांतून वेगवेगळ्या विषयांच्या लाटा या येतच असतात आणि इतकी वर्षे रंगभूमीवर काढल्यावर या लाटा मामांनीही पार केल्या आहेत. कधी ही लाट विनोदाची असते, तर कधी गंभीर प्रवृत्तीची नाटके रंगभूमीवर येत राहतात. मात्र अशा स्थितीत तोल सांभाळण्याचा प्रकार क्वचितच आढळतो. "नटसम्राट" आणि "तरुण तुर्क…"च्या वेळी मात्र असा योग आला होता. एकाचवेळी गंभीर आणि विनोदी नाटक रंगभूमीवर जोरात सुरु होते. यावेळी तो तोल राखला गेल्याचे रसिकांनी पाहिले आहे. एकेकाळी विनोदी नाटके लिहिणारे नाटककार रंगभूमीवर "एक्झिट" घेते झाल्यावर पुढे विनोदाचे काय होणार, असा प्रश्न चर्चिला जात होता; परंतु पुढेही विनोदी नाटक लिहिणारे निर्माण झालेच. मात्र या पार्श्वभूमीवर अलीकडच्या विनोदाची पातळी घसरल्याचे मामांना जाणवते. हल्ली "लॉजिक" नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्नही मामांना अनेकदा पडतो. आंगिक अभिनयाचा अर्थ वेडेवाकडे चाळे करणे असा नव्हे; तर आंगिक अभिनय म्हणजे शरीर बोलले पाहिजे, अशी मामांची धारणा…! भूमिकेला जे अभिप्रेत आहे, ते केवळ वाणीने नव्हे; तर डोळ्यांनी, हातांनी दाखवले पाहिजे. प्रत्येक हातवाऱ्याला किंमत असते. ते खूप "मिनिंगफुल" आहे आणि ते समजून घेऊन नट जे काही करतो ते "फिजिकल प्रोजेक्शन", असे मामांचे म्हणणे…! 
 
मामा म्हणजे रंगभूमीवरचे जबरदस्त रसायन, पण त्याचबरोबर त्यांनी दत्ता भट, अरुण सरनाईक अशा बहुपेडी कलावंतासोबतही काम केले. त्यांची आणि मामांची "वेव्हलेंग्थ" मस्त जुळत होती. एकमेकांच्या कामामुळे त्यांना काम करताना स्फूर्ती मिळत गेली. नटाचे रंगभूमीशी "डेडिकेशन" किती आहे आणि पैशांवर किती आहे, यावर कामाचे स्वरूप अवलंबून असते. केवळ पैसा हा मुख्य उद्देश असेल, तर भारंभार कामे केली जातात. पण जर कला ही गोष्ट मानत असल्यास जे हवे ते मिळवता येते, असे म्हणणाऱ्या मामांनी नाटकाची "डिग्निटी" कायम सांभाळली. म्हणजे नाटक संपल्यावर प्रेक्षकांत मिसळून नाटकाबद्दलची मते जाणून घेण्यापासून ते दोन हात दूरच राहिले. थिएटर पार रिकामे होऊन आणि नटमंडळींच्या चेहऱ्यावरचा रंग पुसल्याशिवाय ते बाहेरच पडत नसत. अगदीच जवळची व्यक्ती असल्याशिवाय त्याकाळी मुळात कुणाला रंगपटात सोडलेच जात नसे. प्रयोग चांगला होतोय की वाईट होतोय, हे नटाला कळत असतेच. एखाद्या दिवशी भट्टी जमली नाही, तर तेही नटाला समजत असते. "गुड बाय डॉक्टर"च्या वेळी मामांनी वादविवादाचाही अनुभव घेतला. दोन नटांमध्ये झालेले हे भांडण मामांनी जवळून पाहिले आणि ही कोडी फोडण्याचा प्रसंगही त्यांनी निभावून नेला. पण यातूनच त्यांनी त्यांची स्वत: नाट्यसंस्था काढली. पुढे "तरुण तुर्क…"सोबत "म्हातारे अर्क बाईत गर्क" हे नाटकही मामांनी केले.  
 
शरीराने साथ देण्याचे नाकारल्यावर प्रयोग करायचे नाहीत असे मामांनी ठरवले, कारण भूमिकेत जिवंतपणा असला पाहिजे हा मामांचा हट्ट…! नाट्यप्रवासातून त्यांच्या जीवनाची नाव हाकत असतानाच त्यांनी वळण घेतले आणि सामान्य जीवनाचा प्रवाह अंगिकारला. आनंदाने जगायचे आणि नाव वल्हवित वल्हवित आनंदाने पैलतीरी पोहोचायचे, अशी इच्छा मामा बोलून दाखवतात. मामा म्हणतात, "ही नाव वल्हवताना एकदा अचानक आश्चर्यजनक प्रकार घडला, तो असा की या प्रवाहातून एक पाच मजली मनोरा वर आला आणि त्या मनोऱ्याचा कळस सोन्याचा होता. ते दृश्य पाहताना मला गंमत वाटली की आपण काम करत असताना असे काही झाले नाही; पण आता हे घडतेय. पण हा आनंद काही वेगळाच आहे. हा आनंद मी निवृत्त झाल्यानंतर मिळतोय हेही काही कमी नाही. असा विचार करत असतानाचा दुरून कुठूनतरी पैलतीरावरून हाका ऐकू आल्या. अरुण सरनाईक आणि दीनानाथ टाकळकर यांच्या त्या हाका होत्या. ते माझ्याआधीच पैलतीरावर पोहोचले आहेत. तिथून ते म्हणताहेत, की बुवा आज तुम्ही कमाल केलीत. आजच्या क्षणाला मला आनंद तर होत आहे, पण त्याचबरोबर मित्र दुरावल्याचे दु:खही आहे. केवळ रंगभूमीवरचे नाटकच नव्हे; तर जीवन हे सुद्धा हसू आणि अश्रूंचे मिश्रण आहे". 
 
ज्या गोष्टीत आनंद नाही, त्यापासून मामा दूर राहिले. जगण्यावर मामांनी मनापासून प्रेम केले. मामांच्याच शब्दांत सांगायचे तर… "ओंजळीत राहते ते गंगाजळ आणि वाहून जाते ते पाणी…! ओंजळीतल्या गंगाजळाकडे दुर्लक्ष करून पाणी वाहून गेले म्हणून जो अतृप्त राहतो, तो कपाळकरंटा…! तसा कपाळकरंटा मी ठरू नये म्हणून मी अट्टहास करत आलो आहे आणि म्हणूनच आयुष्याच्या संध्यासमयी मी तृप्त आहे. मरण हे जगण्याचे ध्येय नाही. कर्तव्य करत आनंदाने जगणे हे जगण्याचे खरे ध्येय आहे".