Join us

माधुरीला मराठी नावडे

By admin | Updated: September 30, 2015 00:41 IST

‘अबोध’ चित्रपटातून एका मराठमोळ्या मुलीने चित्रपटसृष्टीत एंट्री केली आणि ती ‘एक दो तीन’ म्हणत संपूर्ण चित्रपटसृष्टीला ठेका धरायला लावला. त्यानंतर ‘तेजाब’मधून ती यशाच्या उंच शिखरावर पोचली खरी

‘अबोध’ चित्रपटातून एका मराठमोळ्या मुलीने चित्रपटसृष्टीत एंट्री केली आणि ती ‘एक दो तीन’ म्हणत संपूर्ण चित्रपटसृष्टीला ठेका धरायला लावला. त्यानंतर ‘तेजाब’मधून ती यशाच्या उंच शिखरावर पोचली खरी; पण तिच्या मायभाषेतील इंडस्ट्रीला जे विसरली ते आजवर मराठी चित्रपटसृष्टीला हूल देण्यातही तिने ‘हाईट’ केली आहे. या वर्णनावरून नाही तरी किमान चित्रपटांच्या नावावरून तरी तुम्हाला कळेलच, की जिच्या एका स्माईलवर तमाम चाहते फिदा झाले आणि तिच्या मराठी चित्रपटात येण्याची आजवर वाटच पाहत राहिले. इतकेच नाही तर तिनेही ‘हम आप के है कौन’ या अविर्भावात मराठी चित्रपटात येण्याबाबत आजवर फाट्यावर मारले, अशी ही आपली सगळ्यांची लाडकी माधुरी दीक्षित. हे सगळे मांडण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच, की अनिल कपूर, ऊर्मिला मातोंडकर, रितेश देशमुख, सलमान खान आणि आता विद्या बालनसारखी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मराठी चित्रपटात येऊ शकते, तर माधुरी दीक्षित का नाही हे विचारण्यासाठी. तेजाबच्या यशानंतर म्हणे माधुरी मराठी चित्रपट करण्यासाठी चांगल्या कथानकाच्या प्रतीक्षेत होती, तर लग्नानंतर यू. एस.वरून परतल्यावर मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही दाद मिळत असतानाही तिला चांगली स्क्रिप्ट सापडत नसल्याचे ती कारण देत होती. एवढे कमी म्हणून की काय, तर महाराष्ट्राची अ‍ॅम्बेसिडर बनायलाही या मराठमोळ्या मुलीने नकार दिला, तर तीच आॅफर स्वीकारण्याची आमिर खानसारख्या परफेक्शनिस्टने स्वत:हून तयारी दर्शविली होती. हा मुद्दा सोडला तरी आता काही चांगल्या मराठी स्क्रिप्ट्स तिच्या हातात असल्याचे ऐकायला येत आहे. मात्र तिच्या अशा वागण्याने आता प्रश्न असा पडतो, की माधुरीचे बजेट जास्त असल्याने मराठी इंडस्ट्रीला तिचे येणे परवडत नाही की, खरोखरीच तिच्या कपॅसिटीचे कथानक मराठी चित्रपटसृष्टीतील कोणीच आजवर बनवू शकले नाही? आणि खरोखरीच तिला चांगले स्क्रिप्ट मिळाले असेल तर माधुरी अजून किती वाट बघायला लावते, हे पाहणेच आपल्या हातात आहे.