'लाखात एक आमचा दादा' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील सूर्या दादा आणि तुळजाची जोडी प्रेक्षकांना भावली. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर असून लवकरच मालिकेच नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मालिकेत सूर्या दादा राजला पोलिसांच्या ताब्यात देतो. सरनौबत जालिंदरला फोन करून पुतण्याला रिमांड होमला जाण्यापासून वाचवण्यासाठी मदत मागतात. पण जालिंदर याला नकार देतो. कारण, त्याला माहीत आहे की सूर्या कधीच त्याच्या बहिणीच्या सन्मानासमोर तडजोड करणार नाही. सूर्या, जालिंदरला विचारतो की त्याला भाग्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल आधीपासून माहिती होतं का? जालिंदरच्या उत्तरावर सूर्या नाराज होतो. तर दुसरीकडे भाग्या, सूर्या दादाची माफी मागत म्हणते की तिने स्वतःची जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती. सूर्या तिची यात काहीच चूक नसल्याचे सांगतो.
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे या मकर संक्रांतीचा सण साजरा करायची तयारी सुरु आहे. एकीकडे जालिंदर शालन आणि मालन मधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करतोय. तर दुसरीकडे सूर्या आणि तुळजा या सणासाठी जालिंदरकडे आले आहेत. तुळजाकडे शत्रूविरुद्ध पुरावे आहेत. इकडे शत्रूला कळतं की तुळजाकडे काही पुरावे आहेत. जे बाहेर आले तर आपलं काही खरं नाही. त्यामुळे हे समजल्यावर शत्रू खूप घाबरला आहे. शत्रू तेजुला धमकावतो आणि तुळजाकडून पुरावे आणायला सांगतो.
आता शत्रू आणि जालिंदरचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यात तुळजाला यश येईल का? वर्षाच्या पहिल्या सणाला सूर्या-तुळजाच नातं कोणतं नवीन वळण घेणार? हे 'लाखात एक आमचा दादा' मालिकेच्या येत्या काही भागांत बघायला मिळणार आहे.