Join us  

Kishore Kumar Death Anniversary : किशोर कुमार यांनी मधुबालाशी विवाहासाठी बदलला होता धर्म, 4 लग्नांमुळे राहिले चर्चेत

By गीतांजली | Published: October 13, 2020 12:07 PM

गायक किशोर कुमार यांची आज पुण्यतिथी आहे.

गायक किशोर कुमार यांची आज पुण्यतिथी आहे. किशोर कुमार यांचं निधन 13 ऑक्टोबर 1987साली झाले. तेव्हा किशोर कुमार 57 वर्षांचे होते. आज त्यांच्या निधनाला अनेक वर्षं झाली असले तरी त्यांची गाणी, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत. किशोर कुमार यांच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिले. किशोर कुमार यांनी चार लग्न केली होती.

 किशोर कुमार यांचं पहिलं लग्न 1951मध्ये अभिनेत्री रूमा गुहा यांच्यासोबत झाले होते. त्यावेळी किशोर दा बॉलिवूडमध्ये इतके नावाजलेले नव्हते. लग्नाच्या आठ वर्षांनंतर 1958मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. याचं मुख्य कारण म्हणजे, किशोर दा आणि रूमा यांच्यातील करिअरबाबत झालेले वाद. खरं तर किशोर यांना लग्नानंतर रूमाने घर सांभाळावं असं वाटत होतं. पण रूमाला मात्र चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नाव कमावायचं होतं. 

रूमाशी घटस्फोट झाल्यानंतर किशोर कुमार यांनी प्रसिद्ध सिने अभिनेत्री मधुबाला यांच्याशी विवाह केला. त्यावेळी मधुबालाने आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केलं होतं. मधुबाला या मुसलमान असल्याने किशोर कुमार यांनी त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी धर्मांतर केले होते. त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारून करिम अब्दुल असे त्यांचे नाव ठेवले होते. पण लग्नाच्या आधीपासूनच मधुबाला आजारी होत्या. लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्यांचे निधन झाले. 

मधुबाला यांच्या निधनानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात योगिता बाली आल्या. या दोघांमधील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केलं. 1976मध्ये दोघांनी लग्न केलं त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच यांचा संसार मोडला आणि त्यांनंतर योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केलं होतं. 

योगिता यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर किशोर यांच्या आयुष्यात अभिनेत्री लीना चंदावरकर यांची एन्ट्री झाली. आयुष्यात चौथ्यांदा आणि शेवटचं लग्न किशोर कुमार यांनी लीना सोबत केलं. या दोघांना एक मुलगाही असून त्याचं नाव सुमित कुमार आहे. लीना आणि किशोर यांच्या वयात 21 वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे किशोर यांचे आई-वडील या नात्याच्या विरोधात होते.

टॅग्स :किशोर कुमारमधुबाला