केदार शिंदे याचे लेखन-दिग्दर्शन आणि भरत जाधव याचा दमदार अभिनय अशा जबरदस्त केमिस्ट्रीमधून रंगभूमीवर अजरामर झालेले नाटक म्हणजे ‘सही रे सही.’ भरतच्या ‘मदन सुखात्मे’ या भूमिकेने रंगभूमीवर फूल टू धम्माल उडवून दिली. दर्जेदार विनोद आणि निखळ मनोरंजनातून सादर होणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: प्रेमात पाडले. २00२-२00९ दरम्यान सलग प्रयोग सुरू राहण्याचा विक्रम ‘सही रे सही’ने करीत मराठी रंगभूमीवर इतिहास रचला, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. नऊ महिन्यांच्या गॅपनंतर आलेल्या ‘पुन्हा सही रे सही’नेदेखील ‘हाऊसफुल्ल’ प्रेक्षक दिला. १३ वर्षांचा प्रवास पूर्ण करून हे नाटक १४व्या वर्षात पदार्पण करतानाही नाटकाची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही, हेच या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मदन सुखात्मे हे पात्र ज्यांनी कागदावर उतरविले आणि ज्याने त्या पात्राला एकाच वेळी तीनदा रंगभूमीवर जिवंत केले, अशा केदार शिंदे आणि भरत जाधव या दोघांनी नाटकाच्या आठवणी ‘सीएनएक्स’शी बोलताना शेअर केल्या. ‘सही रे सही’ आता लोकांचं झालं आहेइतक्या वर्षांच्या कालावधीत फक्त १-२ वेळा नव्हे तर १५-२0 वेळा नाटक पाहणारे प्रेक्षक लाभणे हे मी माझे भाग्य समजतो. त्याहीपेक्षा अभिमानाची गोष्ट म्हणजे, आज हे नाटक केवळ मराठीपुरते मर्यादित न राहता त्याने भाषांच्या मदतीने राज्याच्या सीमाही ओलांडल्या आहेत. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे एखादे वेळी माझा प्रवेश मी विसरलो किंवा काही गडबड झाली तर मी ते नाटक थांबवू शकतो, पण सुदैवाने आजवर असे कधीही झालेले नाही आणि तसे होऊ न देण्याचाच माझा प्रयत्न राहील, असे भरत जाधव सांगतो. ‘सही रे सही’ची भुरळ विविध भाषांमध्ये रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांनाही इतकी पडली, की मराठी, हिंदी, कन्नड भाषांमध्येदेखील या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. गुजराती रंगभूमीवर शर्मन जोशी स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसद्वारे या नाटकाचे प्रयोग करीत आहेत आणि आता भरत जाधव एंटरप्रायझेसच्या माध्यमातून हे नाटक रंगमंचावर पुन्हा सादर होण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यात इंग्रजी आणि बंगाली भाषांमध्येही या नाटकाचे प्रयोग व्हावेत, अशी इच्छाही केदार शिंदे व्यक्त करतात.यंदाच्या वर्षी ‘सही रे सही’ नाटकाला तब्बल १३ वर्षे पूर्ण होत आहेत. पण खरोखरीच आनंदाची बाब म्हणजे आजही नाटक तितक्याच जोमात सुरू आहे आणि कुठेही प्रयोग असला तरी बुकिंग आॅफिसवर तिकीट विक्रीही तगडी आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की हे नाटक आता माझं किंवा केदार शिंदेचं राहिलेलं नाही, तर ते आता लोकांचं नाटक झालं आहे. - भरत जाधवएखादा लेखक नाटक किंवा त्यातील पात्र कागदावर उतरवतो, पण त्याला कलाकार रंगमंचावर कशा पद्धतीने न्याय देतो, हे पाहणे जास्त महत्त्वाचे असते. ‘सही रे सही’मध्ये ‘मदन सुखात्मे’ हे पात्र चार वेळा रंगमंचावर दिसणे, ही वाटते तितकी सहजसोपी गोष्ट नव्हती. पण भरतने हे आव्हान लीलया पेलले आणि ते शक्य करून दाखविले. त्याने शेवटपर्यंत एक एनर्जी मेंटेन ठेवत नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ‘भरत जाधव’ नसता तर हे नाटक करणे केवळ अशक्यच होते. - केदार शिंदे
केदार-भरतची ‘सही रे सही’ केमिस्ट्री
By admin | Updated: August 19, 2015 02:19 IST