Join us  

१२ वर्षाच्या मुलाची कमाल! KBCमध्ये जिंकले १ कोटी, आठवीतला मयांक कसा बनला 'ज्युनियर करोडपती'?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 4:17 PM

'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झालेल्या एका १२ वर्षाच्या चिमुकल्याने तब्बल एक कोटी रुपये जिंकले आहेत. 

'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रियता असलेला शो आहे. या शोचं १५वं पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. काही प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना कोटी रुपये कमवण्याची संधी मिळते. पण, 'कौन बनेगा करोडपती'च्या हॉट सीटवर बसल्यानंतर भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यामुळे अनेकांच्या हातातून ही संधी जाते. पण, या शोमध्ये सहभागी झालेल्या एका १२ वर्षाच्या चिमुकल्याने तब्बल एक कोटी रुपये जिंकले आहेत. 

मुळचा हरियाणाचा रहिवाशी असलेला मयांक १२ वर्षांचा आहे. तो आठवीत आहे. त्याचे वडील दिल्ली पोलिसात नोकरी करतात. गेल्या काही दिवसांपासून 'कौन बनेगा करोडपती'मध्ये लहान मुलं सहभागी होऊन त्यांच्या ज्ञानाने सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत. या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात मयांकने कमालच करून दाखवली आहे. अवघ्या १२ वर्षाच्या वयात असणारं त्यांचं ज्ञान पाहून बिग बी अमिताभ बच्चनही थक्क झाले आहेत. 

'सोनी टीव्ही'च्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरुन याचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत मयांक विचारलेल्या प्रश्नांची पटापट उत्तरं देताना दिसत आहे. या व्हिडिओत बिग बी त्याला ७ कोटींचा प्रश्न विचारणार असल्याचंही दिसत आहे. आता मयांक अचूक उत्तर देऊन ७ कोटी जिंकतो का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन