मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक मानाचं पान असलेलं अजरामर संगीत नाटक म्हणजे कट्यार काळजात घुसली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि पं. जितेंद्र अभिषेकींच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचला. कला मोठी की कलाकार? गायकी महत्त्वाची की घराणं? या दोन प्रश्नांवर या नाटकाची पूर्ण गोष्ट आधारली आहे. हे नाटक जेव्हा रंगभूमीवर आलं होतं त्या काळात देशात अनेक मोठमोठी संगीत घराणी आपल्या गायकीद्वारे संगीताची सेवा करीत होते. पण, या सेवेसोबतच या घराण्यांमध्ये स्वत:चं वेगळेपण आणि श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची स्पर्धाही रंगत होती. अमूक एक राग, बंदीश किंवा ठुमरी जी आपण गाऊ शकतो, तशी इतर कुणाला गाता येणे शक्य नाही. त्यामुळे आपली गायकी आणि आपलंच घराणं हे इतरांपेक्षा श्रेष्ठ, असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. याच कथासूत्रातून कट्यार... ची निर्मिती झाली. कट्यार काळजात घुसलीमध्ये पंडित भानुशंकर, खाँसाहेब, आफताब हुसैन आणि सदाशिव गुरव ही तीन मुख्य पात्रे. यात खाँसाहेबांची भूमिका साकारली होती ती पंडित वसंतराव देशपांडे यांनी, तर भानुशंकरजीच्या भूमिकेत होते ज्येष्ठ गायक अभिनेते पं. भार्गवराम आचरेकर. एवढ्या वर्षांनंतरही या नाटकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही रंगभूमीवर अनेकांचे वेगवेगळ्या संचासह या नाटकाचे प्रयोग चालू आहेत. हेच नाटक आता भव्य रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी.
रुपेरी पडद्यावर ‘कट्यार...’
By admin | Updated: October 30, 2015 00:33 IST