Join us  

कपिल शर्मा करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

By admin | Published: September 23, 2015 12:17 AM

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कॉमेडी शोद्वारे जगभरात नावारूपाला आलेला कलाकार म्हणजे कपिल शर्मा. प्रेक्षकांना काय हवं आहे ते जाणून तशा प्रकारचे पंच देण्यात त्याचा विशेष हातखंडा.

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कॉमेडी शोद्वारे जगभरात नावारूपाला आलेला कलाकार म्हणजे कपिल शर्मा. प्रेक्षकांना काय हवं आहे ते जाणून तशा प्रकारचे पंच देण्यात त्याचा विशेष हातखंडा. चित्रपटसृष्टीमध्ये देखील हा शो इतका पॉप्युलर झालाय की त्याच्या शोमध्ये आमंत्रण मिळावे, यासाठी सेलीब्रिटींना विशेष उत्सुकता असते. किंबहुना तोच आता एक ‘सेलीब्रिटी’ झाला आहे. खरेतर कपिलबद्दल इतकं का सांगितलं जातंय, असं वाटणं स्वाभाविक आहे. तर सांगण्यामागचा हेतू हा आहे, की नुकताच तो पुण्यात काय येऊन गेला आणि जाताना मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सांगून पुणेकरांची मने जिंकून काय गेला. याला म्हणतात ‘हुशारी.’ ‘किस किस को प्यार करू’मधून प्रथमच तो चित्रपटामध्ये पदार्पण करीत आहे. प्रमोशनसाठी तो पुण्यात आला होता. मी लवकरच मराठी चित्रपटाची केवळ निर्मिती करणार नाही तर त्या चित्रपटात अभिनयदेखील करणार आहे, असे सांगत सर्वांना त्याने सुखद धक्का दिला. दहा वर्षांपासून मी मुंबईत राहतोय. अनेक मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्याबरोबर काम करण्याचा अनेक वेळा योग येतो. त्यांच्याबरोबर मी मला जमेल तसे मराठीत बोलतो. ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात माझ्याबरोबर दोन मराठी अभिनेत्री आहेत. सई लोकूर व मंजिरी फडणीस यांच्याबरोबर मी शूटिंगदरम्यान मराठीत बोलायचो. सई लोकूरने मला मराठीचे धडे दिले. मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार, आॅस्करपर्यंत धडक मारली आहे. मराठी चित्रपट आशयघन असतात. मी मराठीच्या प्रेमात असल्याने लवकरच मराठी चित्रपट काढणार आहे. मराठीतले ग्रेट कॉमेडियन दादा कोंडके मला आवडतात. मराठी लोक खूप प्रेमळ आहेत. मराठी चित्रपटांचा आपण चाहता असल्याचे तो आवर्जून सांगतो.