Join us  

Kaala Movie : सामान्यांचं प्रतिनिधीत्व करणारा 'काला'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2018 7:34 PM

रोजगाराच्या शोधात शहरांमध्ये स्थायिक झालेल्या आणि उच्चभ्रू, मध्यमवर्गीयांनी नाकारलेल्या माणसांच्या संघर्षावर हा सिनेमा बोलतो.

- भागवत हिरेकरकाळा रंग घामाच, कष्टाचं प्रतीक, करोडो हात दिवसरात्र राबतात. घाण साफ करतात. म्हणूनच तर स्वच्छता अस्तित्वात आहे. पण, त्यांच्या कष्टाचं कुणालाही कौतुक नाही. आहे तो प्रचंड तिरस्कार. इथल्या तथाकथित सौंदर्याच्या व्याख्येत काळा रंग जसा हीन. तसेच त्यांचे कष्टही. त्यामुळेच या वर्गातल्या कामगारांचं आयुष्य कधीच सुखकर होत नाही. त्यांच्या वाटेत प्रत्येक टप्प्यावर संघर्षच पेरलेला असतो. विशेष म्हणजे भांडवली विचारांशी जुळवून घेत. जात जाणिवा जिवंत असलेल्या सत्तेतील व्यवस्थेनेच ही पेरणी केलेली असते. हेच ‘काला’तून दिग्दर्शक शेवटपर्यंत सांगत राहतो. ‘शहरीकरणाने जात-वर्ग जाणिवा सैल झाल्या. खेड्यात असेल पण शहरात असं काही राहिलेले नाही. शहरी समाज पूर्णपणे बदललाय. ग्लोबलायझेशनमुळे हे घडल.’ या गोंडस युक्तीवादाला दिग्दर्शक पा रंजित यांचा ‘काला’ थेट भिडतो. रोजगाराच्या शोधात शहरांमध्ये स्थायिक झालेल्या आणि उच्चभ्रू, मध्यमवर्गीयांनी नाकारलेल्या माणसांच्या संघर्षावर हा सिनेमा बोलतो. स्वच्छतेपासून ते दळणवळणापर्यंतच्या अनेक सेवांमध्ये असलेल्या कामगार कसा जगतो. हातावर पोट, पिच्छा न सोडणारं दारिद्रय. शिक्षण, आरोग्यासह मूलभुत सुविधाचा अभाव. सत्ताश्रय मिळवलेल्यांकडून होणारा छळ. हे सगळ त्यांच्या नित्याचंच. या सगळ्यांवर मात करत जगणाºया माणसाला ही व्यवस्था कशी चौहोबाजूने पिडते. याचं चित्रण दिग्दर्शकाने उत्तमपणे पडद्यावर मांडले आहे. ग्लोबलायझेशनच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाºया माणसाचं जगणं सुखकर होण्याचा कळवळा सरकारला आला आहे. त्यांचे जीवनमान उंचवण्याच्या गोंडस नावाखाली जे काही सुरू आहे. या पडद्यामागची कारणे दिग्दर्शकाने नेमकेपणाने पकडली आहे. झोपडपट्टी पुर्नवसन नावाचा प्रकार सुरू आहे. तिथल्या जमिनीसाठी. ती मिळवण्यासाठी मूूळचे बिल्डर असलेले राजकारणी यंत्रणा कशी वापरतात हेही नेमकेपणाने मांडलं आहे. दुसरी गोष्ट. संस्कारातून आलेल्या जात जाणिवा कशा पाळल्या जातात. जात, वर्गाच्या नावाखाली माणूस म्हणून ही तथाकथित व्यवस्था जगणे नाकारते. हेही कथेदरम्यान आलं आहे. हरिदादा (नाना पाटेकर) पाणी नाकारताना दाखवून दिग्दर्शकाने ते अधोरेखित केलं आहे. तसेच विशिष्ट धर्माच प्रतिनिधीत्व करणारा खलनायकच इथल्या व्यवस्थेने नायक म्हणून स्वीकारलेला आहे. त्यांच्या बोलण्यातून सरंजामी वृत्ती जाणवत राहते. त्याच्या होर्डिग्ज्मधून सध्याच्या नेतृत्वाची छबीही संपूर्ण सिनेमादरम्यान प्रतिबिंबित होत राहते. विशेष म्हणजे, आर्थिक मागासलेपण असलेल्या घरातील माणसांची सुधारण्याची धडपडही दिसते. व्यवस्थेविरूद्धच्या संघर्षातूनच एक विचार हा वर्ग स्वीकारतो. गरिबाला घाबरून चालणार नाही, अस सांगणारा काला कलिकरन (रजनीकांत) मुलाच नाव लेनिन ठेवतो. त्यातूनच त्याच्या विचारांची जाणीव होते. उच्चभू्र घरातील स्त्रीपेक्षा कामगाराच्या घरातील बाईचं स्थानही दिग्दर्शकाने वस्तूनिष्ठपणे मांडले आहे. तसेच सत्तेविरुद्ध बंडाचे निशान उभारणा-यांना कसं शत्रू ठरवल जाते. प्रचंड भ्रष्टाचार आणि हत्या पचवणा-याला राम ठरवते. तर स्वत:च्या न्याय हक्कांसाठी लढणा-या कष्टक-यांच्या नेतृत्वाला रावण ठरवणा-या व्यवस्थेच्या तोंडाला हा सिनेमा काळं फासतो. थोडक्यात पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नव्हे, तर कामगार कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे, हा अण्णा भाऊंचा विचार सिनेमा अधोरेखित करतो. त्यामुळेच हा सिनेमा सर्वसामान्याचं प्रतिनिधीत्व करणारा वाटतो.

(लेखक लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये कार्यरत आहेत) 

टॅग्स :काला चित्रपटरजनीकांत