-आदिनाथ कोठारे माझे दोन मित्र आहेत. या जगात आपल्यासारखेच दोन वेडे सापडणं ह्याला खरंच खूप नशीब लागतं. खरे मित्र सापडणं खूप दुर्मिळ. त्यात स्वभाव आणि आवडीनिवडीबरोबर वेडेपणाही मॅच होणं म्हणजे आयुष्यभराचा खजिनाच. माझे खूप जुने मित्र. एक बालपणापासूनचा तर एक कॉलेजपासूनचा. आम्हाला रोड ट्रिप्सवर जायला खूप आवडतं. आणि आमच्या ट्रिपची खासियत म्हणजे आम्ही फक्त ठरवतो या दिवशी ट्रिपला जायचं, त्या दिवशी एकजण त्याची गाडी काढतो. दोघांना पिकअप करतो आणि मग गाडी रस्त्याला लावली की, आम्ही ठरवतो कुठे जायचं ते. ठिकाण आमच्या तिघांच्या मुडवर अवलंबून असतं. खरंतर आम्ही चार वेडे मित्र आहोत. पण चौथा परदेशात काम करत असतो, त्यामुळे तो खूप क्वचितच आमच्यासोबत असतो. तर अशाच एके दिवशी आम्ही तिघे मित्र भेटलो. गाडी नाशिक हायवेच्या दिशेने घेतली. ठिकाण अजूनही ठरत नव्हतं. काही वेगळं सुचलं नाहीच तर नाशिकच्या ‘सुला वाईन यार्ड’ ला जाऊन एक रात्र मुक्काम करुन परतू असा एक ढोबळ विचार मनात होता. ह्या दोन वेड्यांमधला माझा बालपणीचा जो मित्र आहे. तो आता लग्न होऊन मुलगी झाल्यावर त्याच्या गावी शिफ्ट झालाय. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच हा माझा मित्र. आयुष्यातली सगळी मस्ती, सगळे राडे, सगळी माती आणि सगळे किडे, आम्ही एकत्र केले, खाल्ले आणि भोगले. इतरांसारखेच आमच्या मैत्रीतही अनेक उतार-चढाव आले आणि गेले. अशा तो खूपच गहन आणि इमोशनल विषय आहे. तो पुढच्या वेळेस. तर इगतपुरी पासून १० कि.मी. वर असताना आम्हाला एक साईन बोर्ड दिसला त्यावर लिहिल होत, ‘भंडारदार - ५० कि.मी.’ आमच्यापैकी कुणीही याआधी भंडारदाराला गेलं नव्हतं. त्यातल्या त्यात मी खूप ऐकून होतो. जुलै महिना चालू होता. पाऊसही छान पडत होता. आणि आम्ही तीघेही निसर्ग प्रेमी. ठरलं तर. मुक्काम पोस्ट भंडारदारा. तिथे कुठे जायचा? कुठे रहायचं? बुकिंग मिळाल नाही तर? ... बघु ! व्ही विल क्रोस दि ब्रिज व्हेन व्ही कम टू ईट !रोडट्रिपचा खरा आनंद त्याच्या प्रवासात असतो. त्या प्रवासाच्या अनपेक्षितपणा असतो आणि त्या अनपेक्षितपणात दडलेल्या एक प्रकारच्या गूढतेत असतो. मला अस वाटत की, आयुष्यातही खूप प्लॅनिंग करुन आपण कधी कधी जगण्याची खरी मजाच घालवून बसतो. आयुष्यात एक ध्येय नक्कीच ठरवावं. जसं आम्ही कुठेच नाही तर नाशिकच्या सुला वाईन यार्डला पोहोचणारच होतो. पण, ते ध्येय गाठतांना जर वाटेत एका वळणावर एक आणखी सुंदर आणि आणखी मोठी संधी दिसत असेल, जी आपलं पहिलं ध्येय गाठण्यामागची प्रेरणा साधत असेल तर मग गाडी वळवून बघण्यात काय हरकत आहे? फार फार तर काय, यु टर्न घेऊन पुन्हा येऊ हायवेवर आणि जाऊ सुला वाईन यार्डला. पण, मग आणखी पुढे गेल्यावर गाडी वळवणं तितकं सोप नसतं. आणि मग सतत एक खंत वाटत राहते, आपण आयुष्यात पुन्हा त्याच रस्त्यावरून खूप क्वचित जातो, आणि गेलो तरी तेच वळण पुन्हा सापडतील याची शाश्वती नसते.हायवे सोडून भंडारदारासाठी जाणाऱ्या आतल्या रस्त्यावर जसे आम्ही लागलो, तसे आम्ही हळूहळू निसर्गाच्या कुशीत शिरत गेलो. हिरवळ, डोंगर, धुकं ह्यातून वाट काढत काढत आम्ही शेवटी एका छोट्याशा घाटापर्यंत पोहोचलो. तो संपूर्ण घाट आपल्या कापसी ढगाचं पांघरूण ओढून गाढ निजला होता. भवतालचे धबधबेदेखील त्याची झोप मोड होऊ नये म्हणून स्वत:ची ताटी मंदावून वाहत होते. आम्ही त्या निजलेल्या घाटाच्या स्वप्नात विलीन होऊन भारावलेल्या अवस्थेत त्याच्या वळणांना वळसे घालत, त्या दात धुक्यातून वाट शोधात, घाट चढत होतो. कुणीही एकमेकांशी एक शब्दही बोलत नव्हता. हा भंडारदराचा घाट होता. जसे आम्ही त्या घाटाच्या शिखरावर पोहोचलो, आम्हाला काही अंतरावर ती दात धुकं विखुरताना दिसायला लागली आणि भंडाराच्या डोंगरावरून दिसणारा निसर्गरम्य विस्तार अंधुकसा स्पष्ट होऊ लागला. त्या धुक्यातून बाहेर पडताच आमचे डोळे दिपून गेले. ते निसर्गाचं विस्तीर्ण सौंदर्य आमच्या डोळ्यात मावत नव्हतं. क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवळ, दाट धागाच्या मिठीत तल्लीन झालेले डोंगर, त्या डोंगरतुन पाझरणारे असंख्य धबधबे आणि ह्या भारावून टाकणाऱ्या मैफिलीच्या पायथ्याशी, त्या दाटून आलेल्या आभाळचं प्रतिबिंब झळकणार आर्थर तलाव. एक सुप्रसिद्ध हॉलिवूड सिनेमा आहे ज्याचं नाव आहे, ‘जर्नी टू द सेंटर आॅफ दि अर्थ’... ह्या सिनेमातील मुख्य पात्र, जगाच्या खोल पोटात जाऊन एक हरवलेलं जग शोधुन काढतात. आम्हाला त्या क्षणी तसाच काहीतरी भासत होत. जसं की आम्ही एक्सप्लोरर्स आहोत आणि जणू एक हरवलेलं जगच आम्हाला सापडलं आहे.खरंतर जग हरवलेलं नसतं, आपणच हरवलेलो असतो. शहर नावाच्या काँक्रीट जंगलात, आपल्या रोजच्या दगदगीत आपण एक स्वत:चच छोटंसं जग बनवून त्यात घुटमळत असतो. आपण सतत काहीतरी शोधत असतो, ज्यातून आपल्याला समाधान मिळेल, ज्यातून आपण संतुष्ट होऊ. अनेकदा आपण हे समाधान आणि ही संतुष्टता, आपणच निर्माण केलेल्या छोट्याशा जगातल्या, आपणच मोठे बनवून ठेवलेल्या माणसांच्या, त्याच्या आपल्या प्रती असलेल्या स्विकारत शोधत असतो. जे स्वत: त्यांच्याच स्वत:च्या छोट्याशा निर्माण केलेल्या जगात हरवलेले असतात आणि म्हणूनच कदाचित आपण समाधानी किंवा संतुष्ट नसतो.आपण सगळेच एक्सप्लोरर्स आहोत. आपण सतत नव्या जगाच्या शोधात असतो. पण, ह्या काँक्रीटच्या जंगलात आपल्या सगळ्याच होकायंत्र हरवलेलं असतं. पर्यावरणाशी आणि निसर्गाशी आपलं नात तुटल्यामुळे आपण चुकीच्या दिशेने प्रवास करत असतो. निसर्गाच्या संपर्कात आल्यावर आपल्याला आपलं होकायंत्र पुन्हा सापडतं. ते व्यवस्थित काम करायला लागतं. आपल्याला आपला धृव तारा दिसतो आणि मग आपल्याला आपल्या प्रवासाची दिशा कळते. आपण सगळेच एक्सप्लोरर्स आहोत. ‘एँड अवर जर्नी इज टू दी सेंटर आॅफ अवर हार्ट’. आपल्या आत, आपल्या हृदयात एक हरवलेला निसर्ग आहे. आणि मला असं वाटतं की, आपण त्याचा शोध कायम घेतला पाहिजे. असो, हार्टमधला निसर्ग सापडेल तेव्हा सापडेल. आम्हाला त्या क्षणी स्वत:चं हार्टच सापडत नव्हतं. कारण आमचं हार्ट त्याक्षणी भंडारदराच्या निसर्गात हरवून गेलं होतं. तिथेच आजूबाजूला दोन तीन रिसॉर्टस होती. आम्ही ठरवलं इथंच कुठेतरी मुक्काम करायचा. एम.टी.डी.सी. रिसॉर्टमध्ये एरव्ही पावसाळ्यात बुकिंगशिवाय जाणं मूर्खपणाचं ठरेल. पण, आम्ही तरी कुठे शहाणे होतो. आमचं कदाचित नशीब चांगलं होतं. आम्हाला कठड्यावरचं कॉर्नर कॉटेज मिळालं. ज्यावरून संपूर्ण आर्थर तलावाचा विस्तार स्पष्ट दिसत होता. एम.टी.डी.सी. आर्थर तलाव, देव किंवा नशिब. चौघांपैकी एक कोणीतरी त्यादिवशी खूप प्रेमात होतं आमच्या. आम्ही तिघे त्या दिवशी निसर्गाचा आनंद घेत तिथेच राहिलो. तीन मित्र अशा ठिकाणी गेल्यावर जी धमाल मस्ती करतात ती सगळी केली.सकाळी उठलो तेव्हा भान हरपून जावं अस दृश्य आमच्या डोळयांसमोर होतं. इतरांसारखंच रिसॉर्टमध्ये नाश्ता करून आंघोळ करून बाहेर पडू असा विचार मनात आला आमच्या. पण मग इतरांसारखंच शहाण्यासारखे वागलो तर मग काय मजा. ‘व्ही हॅड टू लिव्ह अप टू अवर रेप्युटेशन.’ डोळ्यांसमोर भंडारदऱ्याचं मोहक नैसर्गिक सौंदर्य आम्हाला आणखी कुशीत घेण्यासाठी बोलवत होतंच. आम्ही ठरवलं. आंघोळ, नाश्ता-बिश्ता सगळं. नैसर्गिक पद्धतीने भंडारदारयाच्या खोल निसर्गात शिरून करायचं. आम्ही लगेच आमच्या बॅग पॅक्स घेतल्या आणि चेक-आऊट करून निघालो.भंडारदाराच्या दरीत उतरल्या उतरल्या पायथ्याशी पहुडलेल्या विस्तीर्ण आर्थर तलाव. त्या तलावाच्या काठाला, त्याच्या वळणांबरोबर वळणारा रस्ता आम्हाला भंडारदाराच्या दाट जंगलामध्ये घेऊन जात होता. थोडं आत शिरल्यावर उजव्या हाताला डोंगरातल्या धबधब्यातून तयार झालेले दोन तीन ओढे एकत्र येऊन त्यांच्या एक मोठा ओढा तयार झाला होता जो रस्त्यावरून आतल्या बाजूला थोडया अंतरावर एका छोटयाश्या कठडयावरून धबधबा होऊन कोसळत होता. पुढे जाऊन त्याची एक छोटीशी नदी तयार झाली होती. आम्ही गाडी रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली लावली आणि त्या धबधब्याखाली अंघोळ करायला उतरलो.
‘जर्नी टू दि सेंटर आॅफ दि हार्ट..’
By admin | Updated: July 3, 2017 05:43 IST