Join us  

बॉलिवूड सिनेमांच्या गर्दीत 'झिम्मा २'ची दमदार कमाई! पहिल्या आठवड्याचे बॉक्स ऑफस कलेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 11:40 AM

बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत 'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर घालतोय पिंगा! पहिल्या आठवड्यात किती कमावले? जाणून घ्या 

सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे. सलमानच्या 'टायगर ३'नंतर 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' हे दोन मोठे बॉलिवूड सिनेमे बॉक्स ऑफिसवर नुकतेच प्रदर्शित झाले. पण, या तिन्ही सिनेमांना गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला 'झिम्मा २' हा मराठी चित्रपट तगडी टक्कर देताना दिसत आहे. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' हा मराठी सिनेमा २४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत होते. सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट सांगणारा 'झिम्मा २' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं चित्र आहे. खासकरुन महिला प्रेक्षकवर्ग हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. 'झिम्मा २'च्या स्क्रिनिंगदरम्यानचे थिएटरमधील अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. बहुचर्चित बॉलिवूड सिनेमे असतानाही 'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. 

'झिम्मा २'च्या पहिल्या आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवसापासूनच कोटींमध्ये कमाई करायला सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी 'झिम्मा २'ने १.२० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर तीनच दिवसांत या चित्रपटाने ४.७७ कोटींची कमाई केली होती. आता पहिल्या आठवड्यात 'झिम्मा २'ने बॉक्स ऑफिसवर एकूण ७.३८ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'झिम्मा २' हा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा'चा सीक्वल आहे. हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :मराठी चित्रपटसिद्धार्थ चांदेकररिंकू राजगुरूसायली संजीवमराठी अभिनेता