Join us  

यश चोप्रांच्या सिनेमावर जावेद अख्तर यांचा संताप, अनुष्का शर्माच्या 'त्या' डायलॉगवर घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:44 AM

महिला सशक्तीकरणाचा अर्थच कोणाला समजू शकलेला नाही, जावेद अख्तर भडकले

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) अनेकदा त्यांच्या विधानांवरुन चर्चेत असतात. जे मनात आहे ते खुलेपणाने ते बोलतात. आजकालच्या सिनेमांमध्ये महिलांना मिळत असलेल्या भूमिकांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर माधुरी, श्रीदेवीलाही चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत असं त्यांनी मत मांडलं. शिवाय यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या 'जब तक है जान' सिनेमावर त्यांनी संताप व्यक्त केला. सिनेमातील अनुष्का शर्माच्या एका डायलॉगवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. नेमकं काय म्हणाले जावेद अख्तर?

आजकालच्या सिनेमांमध्ये महिला सशक्तीकरण ज्याप्रकारे दाखवण्यात आलं आहे त्यावर जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, "श्रीदेवी आणि माधुरीसारख्या अनेक टॅलेंटेड अभिनेत्री आल्या. पण त्यांना कधी मोठा रोल मिळाला नाही.  मदर इंडिया, बंदिनी, सुजाता आणि साहिब बीवी और गुलाम या आयकॉनिक सिनेमांसारख्या भूमिका ऑफर झाल्या नाहीत."

यश चोप्रांच्या सिनेमाचं उदाहरण देत ते म्हणाले,"यश चोप्रा यांचा सिनेमा जब तक है जानमधील अभिनेत्री (अनुष्का शर्मा) म्हणते 'लग्नाआधी मला जगातील वेगवेगळ्या स्टाईलने उच्चार करणाऱ्या पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहेत.' महिला सशक्तीकरणासाठी इतकी मेहनत घेण्याची गरज नाही. लेखकांना यातच मॉडर्न महिला दिसतात. यांना सशक्त महिलेचा अर्थच कळलेला नाही. म्हणूनच महिलांना चांगल्या भूमिका मिळत नाहीत. जेव्हा सिनेमात पुरुष गाणी गातील, अॅक्शन करतील तेव्हाच तो सिनेमा आजकाल पूर्ण होतो. सिनेमात काही कंटेंट राहिलेला नाही.फिल्ममेकर आणि लेखकाला समजूच शकलेलं नाही की कंटेंट काय आहे. कारण समाजही याबाबत गोंधळलेला आहे.  सध्या लोकांना ज्याप्रकारचा कंटेंट लोकांना आवडतोय त्यावर सिनेमा बनू शकत नाही."

टॅग्स :जावेद अख्तरयश चोप्रासिनेमाअनुष्का शर्मा