Join us  

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची कोर्टात धाव; 200 कोटींच्या प्रकरणात ED विरोधात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:25 AM

जॅकलीन २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी

Jacqueline Fernandez Money Laundering 200 Crores Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने तिच्यावरील २०० कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द करण्यासाठी दिल्लीउच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तक्रारीत आणि त्यांच्या पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून अभिनेत्रीचे नाव देण्याविरोधात तिने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अभिनेत्रीला फिर्यादी साक्षीदार म्हणून हजर करण्यात आल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखर आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल अभिनेत्रीला काहीही माहिती नसल्याच्या युक्तिवादाचे हे समर्थन करते, असे याचिकेत म्हटले आहे.

सुकेशवर फसवणुकीचा आरोप

महाठग सुकेश चंद्रशेखरवर विविध तपास यंत्रणांनी ३० हून अधिक प्रकरणांमध्ये आरोप ठेवले आहेत. तुरुंगात असतानाही व्हॉईस मॉड्युलेशन सॉफ्टवेअर आणि स्पूफिंग कॉल वापरून दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून २१५ कोटी रुपये उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तुरुंगात असताना त्याने पंतप्रधान कार्यालय, तत्कालीन कायदा मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळले. त्याच्या फोन कॉलमध्ये सुकेशने आरोप केला होता की तो पीडितेच्या पतीला जामीन मिळवून देईल आणि त्याचा औषधी व्यवसाय सुरू करुन देण्यास मदत करेल.

जॅकलिन सुकेश रिलेशनशिप मध्ये होते?

सुकेश प्रकरणात, जॅकलिन फर्नांडिसचे फोटो ऑनलाइन समोर आल्यानंतर तिचे नाव त्या महाठगाशी जोडले गेले. मात्र, अभिनेत्रीने या प्रकरणात कोणताही सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले. त्याचवेळी, चौकशीदरम्यान सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्रीबद्दल ईडीला सांगताना, ते एकमेकांना डेट करत आहेत असे सांगितले होते. त्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले असल्याची माहिती आहे. दरम्यान, जॅकलिनने मात्र त्यांच्या रिलेशनशिपबाबत कधीही भाष्य केलेले नाही.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसदिल्लीउच्च न्यायालयअंमलबजावणी संचालनालय