Join us  

इरफान खानला न्युरो एंडोक्राइन ट्युमर, लाखातून एकालाच होतो हा आजार: असा केला जातो उपचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 8:45 PM

इरफान खान गेले काही दिवस आजारी आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार अतिशय दुर्मीळ असून, लाखांमधून एखाद्या व्यक्तीलाच हा आजार होतो. 

मुंबई - इरफान खान गेले काही दिवस आजारी आहे. स्वत: इरफानने दुर्धर आजार झाल्याची माहिती ट्विटद्वारे उघड केली होती. आता त्याने तो आजार न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर असल्याचे सांगितले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार अतिशय दुर्मीळ असून, लाखांमधून एखाद्या व्यक्तीलाच हा आजार होतो.  इरफानला झालेला आजार न्युरो एंडोक्राइन ट्युमर हा नावामुळे वाटतो तसा मेंदूशी संबंधित असलाच पाहिजे असं नाही. हा आजार पचन ग्रंथींशी संबंधित आहे. त्याच्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. तो आतड्यात, मलाशयात उद्भवू शकतो. या आजारात एंडोक्राइन कोशिकांची वाढ होऊन शरीरात अन्यत्र पसरतो. सातत्यानं होत असलेल्या हगवणीसारख्या त्रासातून या आजाराची लक्षणं आढळतात. काही दिवसांपूर्वी एडीएने या आजारावर उपचारासाठी एका नव्या रेडिओएक्टिव्ह औषधाच्या वापराला परवानगी दिलीय. नव्या औषधांच्या जोडीला इरफान खानची पत्नी सुतापा या आता इरफानसाठी मोठा शक्तिस्त्रोत ठरणार आहेत. सुतापा यांनी फेसबुक पोस्टवर केलेलं आवाहन बोलकं आहे, “सध्या हे युद्ध कसे लढायचं याची रणनीती तयार करतेय. हे युद्ध जिंकायचंच आहे. इरफानचा मित्रपरिवार, हितचिंतक, चाहत्यांनी एक आशा निर्माण केलीय आणि त्या बळावर हे युद्ध मी जिंकणारच!” असे त्या म्हणाल्या होत्या.  इरफानने म्हटलं तसं ज्यांनी त्याच्या शब्दाखातर वाट पाहिली...त्यांना आणखी काही किस्से सांगण्यासाठी तो नक्कीच परत यावा. आजारपण हे चित्रपटातील एखाद्या मध्यंतरासारखंच ठरावं. इरफान आजारावर मात करुन पुन्हा नव्या दमानं नव्या भूमिकांच्या प्रयोगांमध्ये दिसावा. सुतापाचे शब्द खरेच ठरावेत अशी इरफानच्या चाहत्यांची प्रार्थना आहे. 

टॅग्स :इरफान खान