Join us  

भारत-बांगलादेशची सह-निर्मिती असलेल्या ‘बंगबंधू’ चित्रपटाच्या चित्रीकरणास प्रारंभ

By संदीप आडनाईक | Published: January 22, 2021 5:28 PM

मुंबईत फिल्मसिटी येथे मुहूर्त- शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी समारंभ

संदीप आडनाईकपणजी :  भारत आणि बांगलादेश यांची संयुक्तपणे निर्मिती असलेल्या 'बंगबंधू' या शेख मुजीबुर रहमान यांच्यावरील चरित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आखून दिलेल्या कोविड विषयक नियमांचे पालन करत मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे मुहूर्त चित्रीकरण करण्यात आले.ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल हे या चरित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. बांगलादेशच्या राष्ट्रपित्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भारत आणि बांगलादेश यांच्यातील कला आणि संस्कृती क्षेत्रातील निकटच्या सहकार्याचे उदाहरण म्हणून या चित्रपटाचा उल्लेख केला होता. योगायोग म्हणजे  यंदाच्या इफ्फीमध्ये  'कंट्री ऑफ फोकस' बांग्लादेश  आहे.अतुल तिवारी आणि शामा जैदी यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, तर नितीश रॉय चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत. संगीत शंतनू मोईत्रा यांचे आहे. आकाशदीप फोटोग्राफी दिग्दर्शक आहेत. बांग्लादेशचा चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आरिफिन शुवू  यांची बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची भूमिका साकारणायसाठी निवड करण्यात आली आहे. नुसरत इमरोस तिशा या शेख फाजिलतुन्नेसाची भूमिका साकारणार आहे तर नुसरत फरिया, शेख हसीनाची भूमिका साकारणार असून तौकीर अहमद हे सोहरावर्दी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.भारत आणि बांगलादेश दरम्यान दृकश्राव्य सहनिर्मिती कराराअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि बांगलादेश चित्रपट विकास महामंडळ  (बीएफडीसी) यांच्यात गेल्या  वर्षी १४ जानेवारी रोजी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार झाला होता. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या  वर्षी मार्चमध्ये सुरू होणार होते. सध्या सुरू असलेल्या कोविड -१९ महामारीमुळे  चित्रपटाचा पहिला टप्पा आता  मुंबईमध्ये फिल्म सिटी येथे पार पडणार असून सुमारे १०० दिवस चित्रीकरण चालणार आहे. दुसर्या टप्प्यातील चित्रीकरण बांगलादेशात होणार असून प्रामुख्याने मुक्तिबहिनींच्या स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण केले जाईल.

दिग्गज चित्रपट निर्माते  सत्यजित रे यांना यावर्षी इफ्फी श्रद्धांजली अर्पण करत आहे आणि चारूलता, घर बैरे, पाथेर  पांचाली, शतरंज के खिलाडी आणि सोनार केला हे त्यांचे निवडक चित्रपट  महोत्सवादरम्यान  दाखवले जात आहेत.  

टॅग्स :सिनेमाइफ्फी