Join us  

'मल्हारराव जर रूढीवादी असते, तर...', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई'मधील सती विषयक कथानकाबद्दल राजेश शृंगारपुरेनं व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 7:53 PM

अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित पुण्यश्लोक अहिल्याबाई या ऐतिहासिक मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित पुण्यश्लोक अहिल्याबाई (Punyashlok Ahilyabai) या ऐतिहासिक मालिकेस त्यातील आकर्षक कथानकामुळे प्रेक्षकांनी पहिल्यापासूनच डोक्यावर घेतले आहे. या मालिकेत अहिल्याबाईंच्या उदात्त कार्याचे चित्रण आहे. अहिल्याबाई ही आपल्या काळाच्या खूप पुढे असलेली स्त्री होती, जिने आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर समाजातील अनिष्ट रूढींचा विरोध केला आणि लोकांच्या कल्याणसाठी त्या आयुष्यभर झिजल्या. सध्या सुरू असलेल्या कथानकात ‘सती’ या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे. खंडेराव होळकर यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अहिल्याबाईंच्या जीवनातील हा आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. अहिल्याबाई त्यांनी केलेल्या विविध सुधारणांबद्दल ओळखल्या जातात. सती प्रथा नष्ट करणे, त्यापैकीच एक आहे. कुम्हेरच्या लढाईत जेव्हा खंडेराव हुतात्मा झाला, तेव्हा अहिल्याबाईंनी जीवनातील सर्व इच्छा-आकांक्षांवर पाणी सोडले आणि आपल्या दिवंगत पतीसोबत सती जाण्याचे ठरवले. मल्हारराव होळकर हे पहिल्यापासून अहिल्याबाईंच्या जीवनाचे आधारस्तंभ होते. मल्हारराव होळकर हा एक मोकळ्या मनाचा, उमदा माणूस होता आणि ज्यांचा समाजातील रूढीवादी मान्यतांवर आणि परंपरांवर विश्वास नव्हता. अहिल्याबाईंना सती जण्यापासून परावृत्त करणारे मल्हारराव होळकरच होते. त्यांना ठामपणे असे वाटत होते की, केवळ अहिल्याबाईंमध्येच राज्यकारभार सांभाळण्याची क्षमता आहे. आपला मुलगा खंडेराव याच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंना गमावणे मल्हाररावांना परवडण्यासारखे नव्हते. म्हणून, ते नेहमीप्रमाणे खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.

 राजेश शृंगारपुरे म्हणाला, त्या काळी, विशेषतः रूढीवादी वर्तुळात, जेथे सतीची प्रथा खोलवर रुजलेली होती, त्यावेळी मल्हाररावांनी जे केले ते केवळ कौतुकास्पदच नाही, तर आपली मान अभिमानाने ताठ करणारे कृत्य होते. त्याकाळी स्त्रीवाद ही संकल्पनाच आलेली नव्हती. पण या घटनेवरून आपल्याला हा अंदाज बांधता येतो की, लोकांच्या मनात स्त्री-पुरुष समतेचे विचार तेव्हा घोळू लागले होते. आपल्या सुनेला सती जाण्यापासून परावृत्त करून त्यांनी इतिहासाला वेगळे वळण दिले आणि त्यामुळेच आपल्याला अहिल्याबाई या स्त्रीची महती समजली. मल्हारराव जर रूढीवादी असते, तर आपल्याला या महान स्त्रीचा परिचयच झाला नसता. इतिहासातील हे उत्तुंग व्यक्तिमत्व मी साकारत असल्याचा मला अभिमान आहे. मल्हाररावांच्या व्यक्तिरेखेतून हा प्रत्यय आपल्याला येतो की, स्त्री-पुरुष समतेचा विचार लोक त्या काळी करू लागले होते आणि हातात अधिकार असलेले काही लोक ही समता समाजात आणण्यासाठी प्रयत्नशील देखील होते. फक्त विचार करून बघा की, एक सासरा आपल्या सुनेला सांगतो, तेही त्या काळात, की तिने सती जाऊ नये, कारण त्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर राज्याकडे लक्ष देण्यासाठी, प्रजेची काळजी घेण्यासाठी तीच समर्थ आहे. इतकी पुरोगामी आणि प्रेरणादायक कथा लोकांपुढे आणण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. 

टॅग्स :राजेश श्रृंगारपुरे