Join us

ह्रतिकच्या काबिलचा ट्रेलर 'रिलीज' नाही तर 'लीक'

By admin | Updated: October 26, 2016 12:34 IST

काबिलचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाच नव्हता तर तो इंटरनेटवर लीक झाला होता अशी माहिती चित्रपटाचे निर्माते राकेश रोशन यांनी दिली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - अभिनेता ह्रतिक रोशनच्या काबिल चित्रपटाचा अॅक्शन थ्रिलर ट्रेलर काल सगळीकडे प्रदर्शित झाला. सोशल मीडियावरदेखील काबिल चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा होती. पण हा ट्रेलर रिलीज करण्यात आलाच नव्हता तर तो इंटरनेटवर लीक झाला होता अशी माहिती चित्रपटाचे निर्माते राकेश रोशन यांनी दिली आहे. ठरल्याप्रमाणे 26 ऑक्टोबरला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार होता पण आदल्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबरलाच चित्रपटाचा ट्रेलर सगळीकडे प्रदर्शित झाला होता. अभिनेता ह्रतिक रोशननेदेखील ट्विटवर हा ट्रेलर शेअर केला होता. 
 
'चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर पाहून आम्हाला आश्चर्य वाटले आणि धक्काही बसला. असं करुन कोणाला काय आनंद मिळत असेल ? हे वेदनादायी आहे,' असं राकेश रोशन बोलले आहेत. 
 
ट्रेलर लीक झाल्याचं लक्षात येताच डिजीटल टीम सतर्क झाली आणि अधिकृत हँण्डलवरुन रिलीज करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ह्रतिक रोशनच्या ट्विटर अकाऊंटवरुन लीक झालेला युट्यूब व्हिडीओ शेअर करण्यात आला. ट्रेलर लीक कसा झाला याचा तपास सध्या केला जात आहे. 'आम्ही आमची सर्व मार्केटिंग आणि पीआर त्याप्रमाणे ठरवलं होतं. पण आता सर्वच बदलावं लागेल,' असंही राकेश रोशन बोलले आहेत. 
 

काबिल चित्रपटात ह्रतिक रोशन आणि यामी गौतम मुख्य भुमिुकेत आहेत. दोघांनीही अंधांची भूमिका निभावली आहे. दृष्टिहीन प्रेमीयुगुलींची प्रेमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 26 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार असून संजय गुप्ता यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.