- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - बॉलिवूड कलाकारांचे फेसबूक, ट्विटर अकाऊंट हॅक होणे यामध्ये काही नवीन नाही. यावेळी अभिनेता ह्रतिक रोशनचं फेसबूक अकाऊंट हॅक झालं आहे. पण हॅकरने फक्त अकाऊंट हॅक केलं नाही तर अकाऊंटवरुन लाईव्ह स्ट्रिमिंग देखील केलं. हॅकरने अकाऊंट हॅक केल्यानंतर ह्रतिकचा फोटो काढत आपला फोटो प्रोफाईलवर लावला होता. ह्रतिक रोशनने स्वत: अकाऊंट हॅक झालं होतं सांगत आता सर्व नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे.
हे वर्ष ह्रतिकसाठी खूपच कठीण चालू आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच सुझानसोबत घटस्फोट त्यानंतर कंगना राणावतसोबत झालेला वाद. यावर्षी रिलीज झालेला मोहेंजदाडोदेखील फ्लॉप झाला आणि आता फेसबूक अकाऊंट हॅक झाल्याने ह्रतिकचा त्रास काही संपताना दिसत नाही आहे.
अकाऊंट हॅक झाल्याचं लक्षात येताच ह्रतिकच्या टीमने तात्काळ पेज रिस्टोअर केलं. ह्रतिकनेदेखील स्वताचं नाव टाकत आता काही समस्या नसल्याचं सांगितलं आहे.