Join us  

'होणार सून मी ह्या घरची'मधील जान्हवीचे वडील आता दिसणार या हिंदी मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 12:20 PM

'होणार सून मी ह्या घरची' (Honar Sun Mi Hya Gharchi) मालिकेतून जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेतून मनोज कोल्हटकर (Manoj Kolhatkar) घराघरात पोहचले. आता ते हिंदी मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

'होणार सून मी ह्या घरची' (Honar Sun Mi Hya Gharchi) मालिकेतून जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेतून मनोज कोल्हटकर (Manoj Kolhatkar) घराघरात पोहचले. या मालिकेनंतर आता ते सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई: श्रद्धा और सबुरी (Mere Sai Shraddha Aur Saburi) या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मेरे साई: श्रद्धा और सबुरी या मालिकेने भावनिक आणि मार्मिक संदेश देऊन आपल्या प्रेक्षकांना वारंवार प्रभावित केले आहे. प्रेक्षक भक्तिभावाने ही मालिका बघतात आणि साईंच्या चमत्कारांच्या दर्शनाने सद्गदीत होतात. साईंची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मालिकेत साईंच्या वेगवेगळ्या कथा सादर करण्यात येतात. अशीच एक नवीन कथा आता सादर होणार आहे, ज्यात प्रसिद्ध अभिनेता मनोज कोल्हटकर प्रमुख भूमिका करणार आहे. या कथानकात तो जी व्यक्तिरेखा साकारणार आहे, त्या रोचक आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे, बळवंत कुलकर्णी.

बळवंत एक उच्च पदस्थ सरकारी अधिकारी आहे, ज्याची शिर्डीला बदली झाली आहे. या धूर्त अधिकार्‍याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत आणि खालच्या जातीतील लोकांमध्ये मिसळायला त्याला आवडत नसले तरी आपल्या मनात त्यांच्याबद्दल समभाव आहे हे दाखवण्यासाठी तो त्यांच्यात मिळून मिसळून राहण्याचे नाटक करतो. आपला जातीयवादी स्वभाव लपवण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक हा मुखवटा धारण केला आहे. पण, जेव्हा त्याचा स्वतःचा मुलगा खालच्या जातीतील एका मुलीशी विवाह करण्याची आपली इच्छा व्यक्त करतो, तेव्हा त्याचा हा मुखवटा गळून पडतो.

 मनोज कोल्हटकर म्हणाले की, “मेरे साई मालिकेत दाखल होताना मला खूप आनंद होत आहे. ही मालिका खूपच लोकप्रिय आहे आणि मी स्वतः देखील ही मालिका सुरू झाल्यापासून तिचा मोठा चाहता आहे. मी या भागात जरी दुष्टाची भूमिका करत असलो, तरी माझ्या व्यक्तिरेखेतून समाजातील समस्या अधोरेखित करताना मला आनंद होत आहे. अशा मालिकेचा भाग होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे याचे मुख्य कारण म्हणजे मी साईबाबांना मानतो. इतक्या प्रसिद्ध मालिकेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी निर्मात्यांचा ऋणी आहे.”

टॅग्स :मेरे साई मालिका