Join us  

Shocking ! या गायिकेनं चक्क वडिलांच्या विरोधात घेतली न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 4:42 PM

गायिका आणि तिच्या वडिलांमध्ये पालकत्वावरून वाद सुरू आहेत. त्यामुळे तिने या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

अमेरिकन पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. तिने आपल्या वडिलांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ब्रिटनी स्पीयर्स आणि तिचे वडील जेमी स्पीयर्स यांच्यामध्ये पालकत्वावरून मतभेद सुरु आहेत. बुधवारी ब्रिटनीने न्यायालयात या संदर्भात आपली याचिका दाखल केली आहे. ब्रिटनीला तिचे स्वातंत्र्य परत हवे आहे असे तिने या याचिकेत म्हटले आहे.

लॉस अँजेलिस कोर्टात बुधवारी ब्रिटनी स्पीयर्स व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थित होती. जवळपास २० मिनिटे तिने तिची व्यथा सांगितली आणि तिने तिचे स्वातंत्र्य परत मागितले आहे. ब्रिटनी स्पीयर्सने सांगितले की, मला स्वातंत्र्य परत पाहिजे, मला माझे आयुष्य परत पाहिजे. आता या गोष्टीला १३ वर्षे झाली आहेत आणि आता अनेक गोष्टी झाल्या आहेत.  ब्रिटनीच्या वडिलांचा २००८ पासून तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि पैशावरही कायदेशीर अधिकार आहे. ब्रिटनी या सगळ्या गोष्टी सांगत असताना तिचे चाहते न्यायालयाच्या बाहेर तिच्या समर्थनार्थ आले होते. तर सोशल मीडियावर ट्वीट करत अनेकांनी तिला पाठिंबा दर्शविला आहे. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘FreeBritney’ नावाने मोहिम सुरु केली आहे.

ब्रिटनी स्पीयर्सबद्दल सांगायचे तर ती ३९ वर्षांची आहे. तिचे वडील जेमी स्पीयर्स तिच्या पर्सनल लाइफ संबंधित सगळे निर्णय घेतात. या आधी ब्रिटनी मारहाण केल्यामुळे, मानसिक आरोग्य ठीक नसल्यामुळे आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने चर्चेत आली होती. अशा परिस्थितीत तिचे वडील जॅमी यांना २००८मध्ये ब्रिटनीला सांभाळणारे म्हणून नियुक्त केले होते.

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनीने २०१४ मध्ये तिच्या वडिलांचा तिच्या आयुष्यात असणाऱ्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला होता. तिच्या वडिलांवर असलेल्या इतर आरोपांसोबतच त्यांना दारुचे व्यसन असल्याचा आरोपही तिने केला आहे. गेल्या वर्षी ब्रिटनीच्या वकीलांनी कोर्टात सांगितले की ब्रिटनीला तिच्या वडिलांची भीती वाटत होती. ब्रिटनी सुमारे ४४५ कोटी रुपयांची मालक आहे आणि तिचे वडील या पैशाचे आणि तिचे गार्डियन आहेत. कोर्टात बोलताना ब्रिटनी म्हणाली, मी आनंदी नाही. मी झोपू शकत नाही. मी खूप रागात आहे. हे अमानुष आहे. मी दररोज रडते. मला बदल हवा आहे.

या आधी ब्रिटनीने गेल्या वर्षी तिच्या वडिलांचे पालकत्व हक्क काढून टाकण्यासाठी आणि एका संस्थेला तिचा मालमत्ता हक्क देण्यासाठी याचिका दाखल केली होती. तिच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की ब्रिटनी तिच्या वडिलांना “घाबरत” होती. ब्रिटनीचे वडील जेमी २०१६ पासून तिचा मानसिक छळ करत आहेत. हे पालकत्व अत्याचारी आहे आणि ब्रिटनीला आता हे सहन होत नाही. तिच्या वडिलांच्या सांगण्याने ब्रिटनीने तीन नवीन अल्बम केले. अनेक टीव्ही शोमध्येही ती दिसली. त्यांनी लास वेगासमध्ये नवीन घरही विकत घेतले. परंतु जानेवारी २०१९ मध्ये, ब्रिटनीने अचानक घोषणा केली की पुढील सूचना येईपर्यंत तिचे सगळे परफॉमन्स रद्द झाले आहेत.

 २०१९ साली ब्रिटनीने आरोप केला होता की तिचे वडील आणि त्यांचे सहकारी तिला सतत धमकावत आहेत. ते सांगतील तसेच केले पाहिजे, जर मी ते केलं नाही तर ते मला त्याबद्दल शिक्षा देतात. माझे डॉक्टर मला जबरदस्तीने औषधे देतात ​​आहेत. त्यामुळे मला एखाद्या व्यसनी माणसासारखे वाटते. मला स्वतःला एकट्यात कपडेदेखील बदलण्याची परवानगी नाही.