Join us  

‘अवतार 2’चे शूटींग पूर्ण; जेम्स कॅमेरूनने ‘अवतार 3’बद्दलही दिली खूशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 6:10 PM

‘अवतार’सीरिजचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे...

ठळक मुद्दे‘अवतार’ फ्रेंचाइजी जगातील सगळ्यात महागडा सिनेमा आहे. चर्चा खरी मानाल तर या सीरिजचा बजेट 7500 कोटी रूपये आहे. 

‘अवतार’ या प्रचंड गाजलेल्या सिनेमाचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, जेम्स कॅमेरूनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा दुसरा पार्ट अर्थात ‘अवतार 2’ लवकरच बनून तयार होणार आहे. खुद्द जेम्स कॅमेरूनने ही माहिती दिली आहे.‘टर्मिनेटर’ फेम हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर याच्यासोबत व्हिडीओ चॅटद्वारे संवाद साधताना जेम्सने ही माहिती दिली. ‘अवतार 2’चे शूटींग पूर्ण झाले आहे. केवळ इतकेच नाही तर ‘अवतार 3’चेही 95 टक्के शूटींग पूर्ण झाल्याचे जेम्स यांनी यावेळी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी डिज्नीने ‘अवतार’च्या सीक्वल वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याची घोषणा केली होती. त्याआधी हा सिनेमा 17 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होणार होता. नव्या घोषणेनुसार, ‘अवतार 2’ 16 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होईल तर ‘अवतार 3’ हा तिसरा पार्ट 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होईल.  ‘अवतार 4’ हा चौथा पार्ट 18 डिसेंबर 2026 तर ‘अवतार 5’ 22 डिसेंबर 2028 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

प्रदर्शन लांबल्याबद्दल जेम्स म्हणाला...‘अवतार 2’ व ‘अवतार 3’च्या रिलीजला होत असलेल्या विलंबाबद्दल जेम्स म्हणाला, प्रदर्शन लांबले याचा अर्थ माझ्याजवळ चित्रपट संपवण्यासाठी आणखी एक वर्ष आहे, असा नाही. कारण ज्यादिवशी आम्ही ‘अवतार 2’ पूर्ण करू, त्याच दिवसापासून आम्ही ‘अवतार 3’मध्ये बिझी होऊ. सध्या मी न्यूझीलँडमध्ये शूटींग करत आहे. काही लाईव्ह अ‍ॅक्शनच्या दृश्यांचे शूटींग सुरु आहे. आता केवळ 10 टक्के शूट बाकी आहे.  ‘अवतार 2’चे उर्वरित काम 100 टक्के पूर्ण झाले आहे तर ‘अवतार 3’चे 95 टक्के काम आम्ही संपवले आहे.

‘अवतार’ फ्रेंचाइजी जगातील सगळ्यात महागडा सिनेमा आहे. चर्चा खरी मानाल तर या सीरिजचा बजेट 7500 कोटी रूपये आहे. साहजिकच संपूर्ण जगाच्या नजरा या सिनेमाच्या सीक्वलवर आहेत. ‘अवतार’ हा सिनेमा जगातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांच्या यादीत टॉपवर होता. 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमाने बक्कळ बिझनेस करत कमाईचे रेकॉर्ड तोडले होते.

टॅग्स :हॉलिवूड