थोर कर्तृत्व आणि नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा संपूर्ण जगाच्या इतिहासावर उमटविला. आजही त्यांची थोरवी, त्यांचे शूरत्व अनेक कथा, कादंबऱ्यांमधून उजळवले जाते. अशा या धाडसी आणि पराक्रमी स्त्रीच्या शौर्याची गाथा संपूर्ण जगाला कळावी, यासाठी दिग्दर्शिका स्वाती भिसे घेऊन येत आहेत 'दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’. या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा मराठी आणि इंग्लिश भाषेत प्रदर्शित होणार आहे.
तर याबद्दल स्वाती भिसे सांगतात, " देविका एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. हे मत मी एक दिग्दर्शका म्हणून मांडत आहे. प्रत्यक्षात आमच्यात आई मुलीचे नाते असले तरी सेटवर मात्र आम्ही दिग्दर्शक आणि कलाकार म्हणूनच वावरत होतो. देविकाचे बरचसं शिक्षण हे भारताबाहेर झाल्याने, मला देविकाकडून अस्खलित मराठी उच्चार अपेक्षित होते, आणि हे काम देविकाच्या आजीने अगदी लीलया पार पाडले. व्यक्तिमत्वात आणि बोलण्यात मराठीपण दिसावे यासाठी माझ्या आईने तिला खूप मदत केली.
आई असल्याने देविकाच्या जमेच्या बाजू मला माहित होत्या आणि ती कशात कमी आहे हे देखील मला माहित होते. त्यामुळेच तिच्याकडून उत्तम अभिनय करून घेणे मला शक्य झाले.
'दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’ चित्रपट अशा स्त्रीची यशोगाथा सांगतो, जिच्या नुसत्या नावाने इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण व्हायची. स्वाती भिसे दिग्दर्शित, केयेन पेपर प्रॉडक्शन निर्मित आणि पीव्हीआर पिक्चर्सचा हा सिनेमा येत्या २९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.