Join us  

"माझी पात्र जिवंत करून प्रासंगिक केलीत!", हेमंत ढोमेनं 'झिम्मा २'मधल्या कलाकारांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 1:41 PM

Jhimma 2 : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासूनच कोटींमध्ये कमाई करायला सुरुवात केली होती. चित्रपट रिलीज होऊन जवळपास महिना उलटल्यानंतरही हा चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच आहे.

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'झिम्मा २' (Jhimma 2) चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासूनच कोटींमध्ये कमाई करायला सुरुवात केली होती. चित्रपट रिलीज होऊन जवळपास महिना उलटल्यानंतरही हा चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच आहे. बॉक्स ऑफिसवर बिग बजेट चित्रपटांना 'झिम्मा २' दमदार टक्कर देताना दिसत आहे. पाचव्या आठवड्यातही 'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून आहे. दरम्यान आता दिग्दर्शक हेमंत ढोमेने झिम्मा २मधील कलाकारांचे सिनेमातील फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.

हेमंत ढोमेने झिम्मा २मधील कलाकारांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, सगळ्या हिंसक पुरूष पात्रांच्या काळात प्रेम करणारा कबीर…अखेरच्या श्वासापर्यंत आयुष्य सुंदर करणारी इंदू…आपणंच घालून घेतलेली बंधंनं हळूहळू सैल करणारी निर्मला…नव्या रूपात नवं बाईपण जपणारी मनाली…हरवून मग स्वतःला नव्याने सापडलेली मिता…मैत्रीसाठी कोणाशीही दोन हात करणारी वैशाली…Unapologetically honest जगणारी कृतिका… घर सांभाळणारी, आपल्या माणसांवर प्रेम करणारी तानिया…ही सगळी पात्र तुम्ही आपली केलीत… कोणाला कोणीतरी आपली ताई, आई, मावशी, आत्या, मैत्रीण वाटली… कोणालातरी वाटलं आपणंच आहोत!

त्याने पुढे लिहिले की, तुमच्यातलं आणि पडद्यामधलं अंतर पुसून टाकणारी ही पात्र माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंद देणारी आहेत…ही पात्र मेहनतीने, ताकदीने, कधी रूसत, कधी भांडत, कधी रडत, कधी हसत, कधी मस्ती करत… पण प्रेमानं मायेनं साकारणाऱ्या माझ्या या ८ कलाकारांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी ही पोस्ट! लव्ह यू ऑल, तुम्ही माझी पात्र जिवंत करून प्रासंगिक केलीत! 

झिम्मा २ चित्रपटाबद्दल...'झिम्मा २' हा चित्रपट २०२१मध्ये रिलीज झालेल्या 'झिम्मा' चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'झिम्मा २' ने बॉक्स ऑफिसवर १० कोटींहून जास्त कमाई केली आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरूसायली संजीवसिद्धार्थ चांदेकर