Join us  

तो एकदाच अस्वस्थ दिसला, स्मिता गेल्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 6:47 AM

दुडक्या चालीत, भरजरी पोशाखात, रंगमंचावर येणारा ‘घाशीराम’मधला ‘नाना’ या व्यक्तिरेखेमुळे डॉ. मोहन आगाशे जगभरच्या रसिकांच्या लक्षात राहिले.

दुडक्या चालीत, भरजरी पोशाखात, रंगमंचावर येणारा ‘घाशीराम’मधला ‘नाना’ या व्यक्तिरेखेमुळे डॉ. मोहन आगाशे जगभरच्या रसिकांच्या लक्षात राहिले. आंतरराष्ट्रीय परिषदांत मानसिकतेवरचा नवा विचार मांडताना शेकडो पेपरही त्यांनी सादर केले. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवत नाट्यसृष्टीत माणसं जोडत गेले. पद्मश्री आणि संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड विजेता होऊन  राष्ट्रीय स्तरावर हा पुणेकर मान्यताप्राप्त ठरला. जगभर स्नेही जोडणं हे त्यांचं विशेष. फिल्म इन्स्टिट्यूट, एनएफडीसी, थिएटर अकॅडमी, महाराष्ट्र कल्चरल सेंटर अशा नानाविध संस्थांची सर्वोच्च पदं सांभाळत, आपण फक्त ‘ॲक्टर’ नाही तर मॅनेजर, कौन्सिलरही आहोत, हे त्यांनी सहजतेनं दाखवून दिलं.

‘पन्नास वर्षे फुकट हौशी काम केलंत..,’ असं मोहनला म्हणताच तो म्हणतो, अदूर गोपालकृष्ण म्हणतो की रिचनेस फक्त पैशांत मोजू नका. काहीसा चिरकलेला मोहनचा हा चर्चाविषय होण्याआधीच त्यानं असलेल्या आवाजाचा नेमका वापर करत तीच शक्ती ठरवली. जब्बार पटेल यांच्याशी केवळ बी. जे. मेडिकल कॉलेजपुरती मैत्री न राहता, ‘सरहद्द’ ही एकांकिका ते ‘अशी पाखरे येती’ हे नाटक ते ‘घाशीराम’पर्यंत अभिनय करत अभिनेता ते दिग्दर्शक हे सख्य बनलं; पण हा मनानं मास्तरच. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर, खूप सविस्तर मौज घेत, सतत ट्रॅक बदलत विविध उदाहरणं देत आजही समजून देतो. मोहन कधी नेपाळी टोपी, कधी फरकॅप, कधी विस्कटलेले केस, गालाच्या तळापर्यंत आलेले कल्ले अशा रुपात भेटतो तेव्हा त्याचं खुदुखुदु हसणं आणि डावी तर्जनी आपल्या पुढ्यात नाचवणं सुरू झालं की, अंदाज येतो.. आता हा काहीतरी खट्याळ शेरेबाजी करणार.

अमेरिका दौऱ्यात पासपोर्टसह सहकलाकारांची बॅग हरवल्यावर तो एका दिवसात पासपोर्ट मिळवू शकतो! मोहनला मला विचाराचंय की रंगवत असलेल्या व्यक्तिरेखेच्या मनाचा अभ्यास, तू मनाचा डॉक्टर असल्यानं जास्त उपयोगी पडतो का? आणि दुसरा प्रश्न असा की, असंख्य पुणेरी कलावंतांची मोट एकत्र बांधून जगभर घाशीरामचे प्रयोग गाजवताना सायकिॲट्रिक आगाशेंची कन्व्हिन्सिंग पॉवर उपयोगी पडली का? त्याला कायम मी तऱ्हेतऱ्हेची माणसं जोडणारा हसतमुख ‘मोहन’ म्हणूनच पाहत आलोय. तो मला एकदाच टोकाचा अस्वस्थ वाटला. ते म्हणजे ‘स्मिता पाटील’ गेली तेव्हा!

सुधीर गाडगीळ,ख्यातनाम लेखक, संवादक

टॅग्स :मोहन आगाशे