Join us

चित्रपटगृहांची नितांत गरज

By admin | Updated: April 28, 2017 00:47 IST

१९१३ मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट आला होता आणि आज आपल्या चित्रपटसृष्टीला १०४ वर्षं झाली आहेत. या वर्षांमध्ये

१९१३ मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट आला होता आणि आज आपल्या चित्रपटसृष्टीला १०४ वर्षं झाली आहेत. या वर्षांमध्ये आपण चांगलीच प्रगती केली आहे. श्वास या चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले होते आणि आज त्यानंतर अनेक वर्षांनी कासव या मराठी चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले आहे. या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीच्या निर्मात्या कांचन अधिकारी यांनी घेतलेला आढावा...गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीची गणिते बदलली आहेत. आज ३० वर्षं मी मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे. आतापर्यंत मी वेगवेगळ्या जॉनरच्या आठ चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. आपल्या मराठी इंडस्ट्रीत ठराविक चित्रपटांची लाट येऊन गेली असे मला वाटते. व्ही. शांताराम यांच्या काळात सामाजिक चित्रपट अधिक बनवले जात होते. त्यानंतर दादा कोंडके यांनी अनेक कॉमेडी चित्रपट आपल्या इंडस्ट्रीला दिले. त्यानंतर तमाशाप्रधान चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले. नंतरच्या काळात बुद्धिवादी प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून चित्रपटांची निर्मिती केली गेली. पण आजचा काळ हा मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात चांगला काळ आहे असे मी म्हणेन. व्हेंटिलेटर, कट्यार काळजात घुसली, नटसम्राट असे विविध विषयांवरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. चित्रपटगृहांचे समीकरणदेखील आजच्या काळात प्रचंड बदलले आहे. पूर्वी बारा, तीन, सहा, नऊ असे चित्रपटगृहात शो असायचे. पण आता चित्रपटगृहात सकाळी सातपासूनच चित्रपट दाखवला जातो आणि कॉलेज विद्यार्थ्यांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीसाठी हा उत्क्रांतीचा काळ आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सैराटसारख्या चित्रपटाने मराठी चित्रपटाला कॉलेज युवक जातो हे सिद्ध केले. खरे तर सैराटने एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण प्रेक्षकांना त्या संदेशापेक्षा या चित्रपटाची गाणीच अधिक भावली. माझ्या चित्रपटात झिंगाटच कळला, हे चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेला म्हणावे लागेल, हे दुर्दैव आहे. पुण्यातील एक मोठे चित्रपटगृह तोडून नुकतीच तिथे तीन मल्टिप्लेक्स बांधण्यात आली. ही खरी तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपल्याकडे चित्रपटांची संख्या अधिक असून आपल्याला केवळ ५२ आठवडे मिळतात. त्यामुळे अनेक चित्रपट एकत्र प्रदर्शित झाल्याने त्यांना चित्रपटगृह मिळत नाहीत. सिंगल स्क्रिनची क्षमता हजार-बाराशेच्या जवळपास असते. आज कोणतेही चित्रपटगृह एवढे भरतच नाही. त्यापेक्षा दोनशे अडीशेची क्षमता असलेले चित्रपटगृह बनवण्याची गरज आहे. पण या गोष्टीकडे सांस्कृतिक खाते दुर्लक्ष करीत आहे. चित्रपट बनवल्यानंतर त्याचे प्रमोशन करणे हे अधिक महत्त्वाचे असते. प्रमोशन म्हणजे माझा चित्रपट येत आहे. पाहायला या असे लोकांना सांगणे. पूर्वी केवळ वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून प्रमोशन केले जात असे. पण आता या गोष्टी बदलल्या आहेत. चित्रपट प्रमोशन कशा प्रकारे बदलले आहे हे पुढील लेखात आपण जाणून घेऊया.