Join us  

अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा सोडण्यामागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 6:57 PM

Mahesh Manjarekar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणदीप हुड्डाला महेश मांजरेकरांना चित्रपट अर्ध्यात का सोडावा लागला, याबद्दल विचारण्यात आले. मात्र त्याने त्यावर उत्तर देणे टाळले. दरम्यान आता यावर महेश मांजरेकरांनी या चर्चांवर मौन सोडले आहे.

बहुचर्चित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Sawarkar) हा चित्रपट अलिकडेच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. वीर सावरकर यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर उलगडण्यात आला आहे. अभिनेता रणदीप हु्ड्डा(Randeep Hudda)ने या सिनेमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्यानेच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरूवातीला महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) करणार होते, मात्र त्यांना हा सिनेमा अर्ध्यातून सोडावा लागला. त्यावेळी उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता याबाबत महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.  

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणदीप हुड्डाला महेश मांजरेकरांना चित्रपट अर्ध्यात का सोडावा लागला, याबद्दल विचारण्यात आले. मात्र त्याने त्यावर उत्तर देणे टाळले. दरम्यान आता यावर महेश मांजरेकरांनी या चर्चांवर मौन सोडले आहे. ते म्हणाले की, वीर सावरकर यांच्या चित्रपटाला न्याय देऊ शकले नाही, तर तो चित्रपट का बनवायचा? त्यात जर रणदीप हुड्डा नसता तर मी उत्तम चित्रपट बनवला असता. रणदीप हुड्डाने वीर सावरकरांबद्दल वाचले नाही का? तसे मुळीच नाही त्याने माझ्या तीनपट सावरकर वाचले आहेत. प्रॉब्लेम हा झाला की त्याने सगळेच वाचले. मी वीर सावरकर सिनेमा का सोडेन? मला करायचा होता सिनेमा. पण या सगळ्या परिस्थितीमुळे मी तो केला नाही. 

रणदीप हुड्डाला सावरकर काळे की गोरे हेदेखील माहित नव्हतं

लोकसत्ता अड्डाला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले की, मला सावरकरांविषयी खूप आकर्षण आहे. पण खरे सांगायचे तर ज्याने हा चित्रपट केला आहे, त्यांना त्याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. मला कायम वाटायचं की आपण सावरकरांवर चित्रपट करायला हवा. त्यासाठी मग संदीप सिंह निर्माता होता, तो आला. मग मुख्य भूमिकेसाठी रणदीप हुड्डाला घ्यायचे ठरले. रणदीप हुड्डाला सावरकर काळे की गोरे हेदेखील माहित नव्हतं. पण त्यासाठी त्याने संपूर्ण इतिहास वाचून काढला आणि हे त्याचे श्रेय आहे. 

निगेटिव्ह परिस्थिती निर्माण होऊ लागली

रणदीप हुड्डाला आधी वाटले होते की सावरकर व्हिलन आहेत. मग मी त्याला सांगितले की तू आधी सगळे वाचून काढ. या चित्रपटातील ७० टक्के स्क्रिप्ट हे माझे आहे. पहिल्या वाचनाला त्याने सांगितले हे हवं आहे, ते हवे आहे. त्यानंतर तो हस्तक्षेप करु लागला.  स्क्रिप्ट लॉक होईना, शूट खोळबलं होतं. बजेट वाढू लागलं होतं. मला तर वाटलं की मी मरेन. कारण चित्रपट वाईट झाला तर लोक टीका करतील. त्यानंतर निगेटिव्ह परिस्थिती निर्माण होऊ लागली. 

एकतर चित्रपट रणदीप हुड्डाला करू दे किंवा मला

शेवटी महेश मांजरेकर यांनी निर्मात्यांना सांगितलं की, एकतर चित्रपट रणदीप हुड्डाला करू दे किंवा मी करतो. त्यानंतर तो दिग्दर्शनाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करु लागला. एक दिवस त्याने माझ्या हातात स्क्रिप्ट ठेवले आणि म्हणाला की ही सव्वा दोन तासांची स्क्रिप्ट आहे. मी म्हटले माझ्याकडे साडेचार तासांची स्क्रिप्ट आहे. रणदीपला भेटायला जावे तर तो वीर सावरकरांच्या वेशात बसलेला असायचा, मी त्याच्यातल्या अभिनेत्याशी संवाद कधी साधायचा? मग मला वाटू लागले की रणदीप हुड्डा जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करत होता. शेवटी मी निर्मात्याला सांगितलं की तू त्याला निवड किंवा मला निवड कारण मला हवाय तसा चित्रपट रणदीपसोबत होऊ शकत नाही, असेही मांजरेकरांनी या मुलाखतीत सांगितले.  

टॅग्स :रणदीप हुडामहेश मांजरेकर