Join us  

मानवी तस्करीवर आधारीत अ‍ॅनिमेशनपट 'रीना की कहानी'; आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिना दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 7:54 PM

रीना की कहानी हा साडे नऊ मिनिटांचा चित्रपट मानवी तस्करीच्या भीषणतेवर प्रकाश टाकतो.

इन अवर वर्ल्डचे निर्माते आणि दिग्दर्शक श्रेड श्रीधर, १० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मानवी तस्करीवरील अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. “रीना की कहानी”, हा साडे नऊ मिनिटांचा  चित्रपट मानवी तस्करीच्या भीषणतेवर प्रकाश टाकतो. खरे तर त्यांचे एजंट हे आपल्यामध्ये लपून राहून, त्यांचा पुढचे सावज हेरत असतात, हेरण्याच्या प्रयत्नात असतात.

वास्तविक जीवनातील कथेवर आधारित, हा चित्रपट अनेकानेक स्वप्नं घेऊन आलेली मुलगी रीनाच्या देह व्यापारात अडकण्यापर्यंत आणि त्यानंतरच्या सुटकेपर्यंतचा तिचा मार्ग हा प्रवास आपल्यापुढे ठेवतो. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या समाजातील दुर्बल घटकांतील मुलींना हुशारीने लक्ष्य करणे, खोटी आश्वासने आणि चांगल्या जीवनाचे आमिष यासारख्या गुन्ह्यांना मदत करणाऱ्या विविध असुरक्षिततांवरही हा चित्रपट प्रकाश टाकतो. संभाव्य बळींची शिकार करण्यासाठी आणि या गुन्हेगारी कृत्यांमधून उदरनिर्वाहासाठी तस्करांकडून कसे षडयंत्र रचतात. एकापरीने हा चित्रपट म्हणजे जगण्याची एक कथा आहे, ज्यामध्ये जोखमीची परिस्थिती कशा हेराव्यात आणि त्या  टाळता येऊ शकतात; तसेच, पीडित आणि अत्याचार करणाऱ्यांना कसे ओळखायचे, याचे दिशादर्शन मिळते. श्रीधर यांच्या स्टुडिओने श्रेड क्रिएटिव्ह लॅबने मानवी तस्करीविरोधी स्वयंसेवी संस्था 'विहान'च्या सहकार्याने बनवलेला, रीना की कहानी हा चित्रपट पालक, मुले आणि काळजी घेणाऱ्यांनी संभाव्य धोके समजून घेण्यासाठी आणि स्वतःला आणि त्यांच्या प्रियजनांना अशा वाईट गोष्टींपासून वाचवण्यासाठी पाहणे आवश्यक आहे.

या चित्रपटाबद्दल श्रेड श्रीधर म्हणाले, “मला आशा आहे की या चित्रपटाद्वारे मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांबद्दल मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये अधिक चर्चा होईल. आपल्याकडे विविध सामाजिक विषयांवर चित्रपट आहेत. लैंगिक व्यापार, वेठबिगार कामगार आणि गुलामगिरीसाठी मानवी तस्करी हा बातम्यांमधून लुप्त झालेला एक अब्ज डॉलरचा उद्योग आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, असुरक्षितता आणि धोके कसे ओळखायचे याबद्दल लोकांना जागरूक असणे आवश्यक आहे.” हा चित्रपट श्रेड क्रिएटिव्ह लॅबच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळणार आहे.